पुलांचे कठडे गायब
बीड : तालुक्यात अनेक ठिकाणी पुलांना बसविण्यात आलेले लोखंडी कठडे गायब झाले आहेत. अनेक मद्यपी अथवा चोरट्यांनी पुलाला बसवलेले लोखंडी पाइप तोडून भंगारामध्ये नेऊन विकले. त्यामुळे वाहनांना पुलावरून जाताना धोका निर्माण होत आहे.
इंटरनेट विस्कळीत
बीड : मागील काही दिवसांपासून बीड शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरनेटला स्पीड मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. पावसामुळे काही भागात ही समस्या उद्भवत असल्याचे सांगण्यात येते.
अवैध धंदे जोमात
पाटोदा : परिसरात बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू आहेत. हॉटेल, पानटपरी तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो. तसेच अवैधरीत्या दारूची विक्री होत आहे. याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
आवश्यक सेवेला इंधन द्या
अंबाजोगाई : दुपारी चारनंतर संचारबंदी लागू असली तरी शहरात दुचाकीवर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहेत, अशाच व्यक्तींना पेट्रोल द्यावे जेणेकरून नियम पाळले जातील.