लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : पेट्रोल पंपावर थांबलेल्या दुधाच्या टँकरवर चढून टाकीमध्ये पेट्रोलियम पदार्थ टाकून दोन लाखांचे दुध खराब केल्याचा अघोरी प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अज्ञात सहा जणांवर आष्टी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार करणारे कोण असावेत? याबद्दल उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील प्रभात दुध डेअरीचे टॅँकर (एम.एच. १७ एजी ७७६६ ) आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी, चिंचपूर व आष्टी येथील केंद्रावर दुधाचे संकलन करण्यासाठी शनिवारी दुपारी आष्टी येथे आले. दुध संकलन करत हे टँकर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नगर-बीड रोडवरील एका पंपाजवळ थांबले होते. यावेळी टँकरचालक शकील शेख हा लघुशंकेसाठी गेला असताना टॅँकरमध्ये केमिस्ट मच्छिंद्र गागरे हे एकटेच असल्याची संधी साधून अज्ञात सहा लोक तिथे आले.
त्यापैकी चौघांनी गागरे यांचे तोंड दाबले तर दोघांनी टँकरवर चढून झाकण उघडले आणि आतील दुधात पेट्रोलियम पदार्थ टाकून सर्व दूध खराब केले. यात अंदाजे २ लाख १० हजारांचे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनेमुळे खळबळ उडाली असून, नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.