पुरूषोत्तम करवा
माजलगाव - आमदार प्रकाश सोळंके यांच्या मुलाचा कार्यकर्त्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल लागला, यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर प्रकाश सोळंके यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. यावेळी सोळंके यांचे पुत्र विरेंद्र सोळंके हे विजयी झाल्याने त्यांना कार्यकर्त्यांनी हार घातला. यावेळी मला हार का घातलास, असे म्हणत त्यांनी त्या कार्यकर्त्यास लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची घटना घडली.
माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी पार पडली. तीन वाजेपर्यंत मतदान होऊन त्यानंतर तात्काळ मतमोजणी घेण्यात आली. आमदार सोळंके यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी वाटत असताना विरोधकांनी सहा जागा जिंकून यांच्या सत्तेला शह दिला. या निवडणुकीत त्यांचे पुत्र वीरेंद्र विजय झाले. ते मतमोजणी केंद्राच्या बाहेर येताच एका कार्यकर्त्याने त्यांना हार घालण्याचा प्रयत्न केला व त्या कार्यकर्त्यांनी त्यांना हारही घातला.
यावेळी मला हार का घातलास याचा राग येऊन वीरेंद्र सोळंके यांनी या कार्यकर्त्यास सुरुवातीला डोक्यात त्यानंतर पोटावर मारहाण केल्यानंतर शेवटी लाथांनी देखील मारहाण केल्याची घटना पंचायत समिती आवारात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांनी कार्यकर्त्यास मारहाण करताच या ठिकाणी जमा झालेले सर्व पक्षीत कार्यकर्ते अवाक झाले. दरम्यान त्यांना कार्यकर्त्यांनी धरून बाजूला काढून गाडीत बसून घेऊन गेले.
आमदार पुत्राला विजयाचा उन्माद चढल्याने त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जाऊ लागला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत सभापती पदाचे वीरेंद्र सोळंके हे दावेदार मानले जात आहेत. ते सभापती झाल्यानंतर सभासद व शेतकऱ्यांना ते अशीच वागणूक देणार का ? अशी चर्चा शहरात रंगली होती.