बीड : दहावी, बारावी परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा मंडळ, शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाने कडक सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. केज तालुक्यातील विडा येथील परीक्षा केंद्रावर सोमवारी भरारी पथकाच्या पाहणीत परीक्षा हॉलमध्ये परीक्षा देणा-या ४ विद्यार्थी आणि ३ शिक्षकांकडे मोबाईल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विडा व वडवणीत सात विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली आहे.
बारावीच्या परीक्षा सुरु झाल्यानंतर भरारी पथकांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन तपासणी केली होती. कॉपी बाळगणाºया विद्यार्थ्यांना रस्टिकेट करण्यात आले. या कारवाईच्या आकड्याने शंभरी गाठली आहे. तर लाडझरी येथे एका शिक्षकाकडे मोबाईल आढळून आला होता. त्याच्यावरही कारवाई करण्यात आली होती. या घटनांमुळे खळबळ उडाली आहे.विडा, वडवणीत सात विद्यार्थी रस्टिकेटसोमवारी दहावीच्या हिंदी विषयाची परीक्षा होती. केज तालुक्यातील विडा येथील रामकृष्ण विद्यालय परीक्षा केंद्रावर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांच्या भरारी पथकाने तपासणी केली. या वेळी चार विद्यार्थ्यांकडे मोबाईल आढळून आले तर एकाकडे कॉपी आढळली. या पाचही विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई झाली. तसेच या केंद्रावर पर्यवेक्षक असलेल्या तीन शिक्षकांकडे आढळलेले मोबाईलही पथकाने जप्त केले. दरम्यान वडवणी येथील मंकावती विद्यालय परीक्षा केंद्रावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विनोद देवकर यांच्या भरारी पथकाने कॉपी बाळगणाºया दोन विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई केली.
मोबाईल सीईओंकडे जमापरीक्षा हॉलमध्ये प्रतिबंध असताना मोबाईल आढळून आलेल्या संबंधित विद्यार्थी व शिक्षकांवर कारवाई केली आहे. हे मोबाईल मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्याकडे जमा करण्यात येतील. तसेच संबंधित शिक्षकांना परीक्षा कामातून वगळले आहे. गैरप्रकार कमी होतील, अशी शक्यता असताना काही विद्यार्थी व शिक्षक जुमानत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
भरारी पथकांची संख्याही अपुरीचजिल्ह्याची भौगोलिक रचना, परीक्षा केंद्र, परीक्षार्थ्यांची संख्या पाहता भरारी पथकांची संख्या कमी आहे. प्रत्येक केंद्रावर बैठे पथक आहे, मात्र त्यांनी केलेली कार्यवाही अद्याप लक्षात आलेली नाही. महिलांचे विशेष भरारी पथक आहे. या पथकाकडून अद्याप एकही कारवाई झालेली नाही.
झेरॉक्स, फॅक्सकडे दुर्लक्षपरीक्षा केंद्र परिसरात १४४ (२) कलम जारी केलेले आहे. केंद्राच्या परिसरात २०० मीटर अंतरापर्यंत शासकीय कर्तव्य पार पाडणाºया अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी यांच्या व्यतिरिक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास, सर्व झेरॉक्स केंद्र, फॅक्स केंद्र व ध्वनिक्षेपक वाजविण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तसे आदेश जिल्हा दंडाधिकाºयांनी दिलेले आहेत. वास्वविक पाहता, या आदेशाला केराची टोपली दाखविली जात आहे. केंद्र परिसरात झेरॉक्स, फॅक्स केंद्र सर्रास सुरू असून घोळक्याने गर्दी करणा-यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. याकडे मात्र केंद्र प्रशासन आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
मित्र, पालकांचा सहभागग्रामीण भागात पोहचण्यास पथकांना खराब रस्त्यासह इतर अडचणी असतात.ही बाब ओळखून दुर्गम भागातील केंद्रांवर नियोजनबध्दपणे कॉप्यांचा सुळसुळाट आहे.विशेष म्हणजे यात विद्यार्थ्यांचे मित्र, पालक आणि केंद्रावरील काही शिक्षक यात सहभागी असतात. पथकावर दूरवरुनच नजर ठेवली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.