.....
संरक्षक कठड्यांच्या दुरुस्तीची मागणी
अंबेजोगाई : तालुक्यातील चिचखंडी मार्गावर असलेल्या बुट्टेनाथ घाटातील संरक्षक कठडे व रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. घाटातील संरक्षक कठडे ढासळले असून, कोठेही दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे या घाट रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. हा धोका लक्षात घेता, सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटातील संरक्षक कठड्यांची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी होत वाहनधारकांमधून होत आहे.
----------------------
पशुपालकांच्या हितासाठी दुग्ध योजना राबवा
अंबेजोगाई : तालुक्यात दुधाळ जनावरांची संख्या घटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होत चालले आहे. सहा वर्षांपूर्वी अधिक दुग्ध उत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या. मात्र, त्यातील अनेक दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. दुग्ध योजना राबविल्यास पशुपालक, तसेच सहकारी संस्थांना फायदा होईल.
----------------------
पशुखाद्य महागल्याने शेतकऱ्यांची अडचण
अंबेजोगाई : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारला जातो. यामुळे जनावरे सुदृढ राहून दूध जास्त देतात. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यांनाही बसला आहे. किमती १० टक्क्यांनी वाढल्या. त्यामुळे पशुपालक चिंताग्रस्त आहेत. अनेक जनावरे विकली जात आहेत. अंबेजोगाई उपविभागातील अनेक गावात रात्रीच्या सुमारास पाळीव जनावरांची तस्करी होत असल्याचे चित्र आहे.
---------------------
व्यवसायासाठी कर्ज देण्याची मागणी
अंबेजोगाई : महिला बचत गटांची संख्या बरीच वाढली, परंतु स्वयंरोजगार उभे करण्यासाठी अपयश येत आहे. बँकेकडून कर्ज उपलब्ध होत नसल्याने, महिला बचतगट अत्यंत छोट्या व्यवसायात अडकल्या आहेत. यातून पुरेसा आर्थिक मोबदला मिळत नाही. त्यामुळे महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी बचतगटांना कर्ज देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
------------------
हॉटेलमधील गर्दीवर नियंत्रण हवे
अंबेजोगाई : कोरोनाची रुग्णसंख्या संख्या कमी झाल्याने, प्रशासनाने काही अटी व शर्तीवर हॉटेल व इतर व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, गर्दीवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. असे असले, तरी शहरातील काही हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन गर्दीवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे, अन्यथा पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल.