लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : मोबाईल कंपन्यांनी गेल्या काही महिन्यापासून मोबाईल सेवेचे दर मोठ्या प्रमाणात वाढविले. मात्र दरवाढ केल्यानंतरही मोबाईल कंपन्यांची सेवा मात्र अत्यंत दर्जाहीन व डोकेदुखी ठरत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांना वठणीवर आणावे, अशी मागणी मोबाईल धारक करीत आहेत.
गेल्या काही महिन्यापूर्वी मोबाईल सेवेचे दर मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले. शिवाय दर महिन्याला एका ठराविक रकमेचे रिचार्ज करावेच लागेल. असा नियम लागू करण्यात आला. मात्र दर वाढविल्यानंतरही मोबाईल सेवेचा दर्जा मात्र सुधारण्याऐवजी आणखी खालावला आहे. अंबाजोगाईत विविध मोबाइल कंपन्यांचे मोबाईल धारक आहेत. त्यापैकी अनेक मोबाईल धारकांच्या चांगल्या दर्जाच्या मोबाईल हॅण्डसेटला इंटरनेटची रेंज मिळत नाही.
....
म्हणायला फोरजी, सेवा टूजी पेक्षाही वाईट
फोरजी सेवेच्या नावाने पैसे उकडून ही टूजी पेक्षाही वाईट दर्जाची सेवा मोबाईल ग्राहकांना मिळत आहे. मोबाईल ग्राहकांमध्ये मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांविरुद्ध प्रचंड रोष आहे. परंतु याबाबत तक्रार कुठे करावी हे अनेकांना माहीत नाही. संबंधित मोबाईल कंपनीच्या कस्टमर केअरला फोन केल्यानंतर हे कस्टमर केअरचे फोन म्हणजे त्यापेक्षाही मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळे या सर्व मानसिक त्रासापासून मोबाईल धारकांची मुक्तता करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.