लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मोबाईल चोरून त्यांचे आयएमईआय क्रमांक बदलून विक्री करणाºया टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी पर्दाफाश केला होता. परंतु याच विभागातील काही कर्मचा-यांचा या टोळीसोबत ‘संपर्क’ होता, अशी माहिती समोर येत आहे. गुन्हे शाखेचे तीन आणि दरोडा प्रतिबंधकचे दोन, असे पाच कर्मचारी यामध्ये सहभागी असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. याला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्याकडूनही दुजोरा देण्यात आला आहे.
सध्या बीड जिल्हा पोलीस दल चांगल्या कामगिरीमुळे राज्यात चर्चेत आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी प्रामाणिक कर्तव्य बजावत आहेत. परंतु काही अधिकारी, कर्मचाºयांचा कर्तव्यात होत असलेला कसूर, कामचुकारपणा आणि आरोपींकडे होत असलेले ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष यामुळे पोलीस दल बदनाम होत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेतही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. याच विभागातील तीन व दरोडा प्रतिबंधक पथकातील दोन कर्मचाºयांनी कर्तव्यात कसूर करून आरोपींना सहकार्य केल्याचे समोर येत आहे. त्यांची चौकशी केली जाणार असल्याचेही सूत्रांकडून समजते.सहा महिन्यांपूर्वीच पकडले असते तर...मोबाईल चोरणाºया टोळीतील आरोपींना सहा महिन्यापूर्वीच पकडले होते. परंतु वरिष्ठांना माहिती न होऊ देता या आरोपींना ‘अर्थपूर्ण’ सहकार्य केले होते. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल हस्तगत करून त्यांचा याच टोळीकडून आयएमईआय क्रमांक बदलून घेतला होता. त्यानंतर या कर्मचाºयांनी ते विक्री केल्याचेही सूत्रांकडून समजते.
विश्वसनीय पोलीस सूत्रांच्या माहितीनूसार टोळीतील आरोपींनी या पाच कर्मचाºयांची नावेही सांगितले आहेत. आता यामध्ये किती तथ्य आणि किती खोटे, याचा तपास लावण्याचे आव्हान अधिकाºयांसमोर आहे. यात दोषी आढळले तर उत्कृष्ट कामगिरी बजावणारी एलसीबी आणि एडीएसची प्रतिमा मलीन होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.