बीड : मोबाइल लांबवणाऱ्या चोरट्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी धुडगूस घातला होता. या टोळीचा पर्दाफाश करीत स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. तिघांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून ९ मोबाइल व एक दुचाकी असा दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रोहित लक्ष्मण काळे (रा. एकतानगर, बीड), प्रवीण विठ्ठल नाडे व एक विधिसंघर्षग्रस्त बालक यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. शहर व परिसरात मोबाइलवर बोलत असलेले पादचारी तसेच कानाला मोबाइल लावून निघालेल्या दुचाकीस्वारांचा पाठलाग केला जात असे. त्यानंतर हे चोरटे सिनेस्टाइल मोबाइल हिसकावून दुचाकीवरून पळ काढत होते. गेल्या काही दिवसांपासून या टोळीने बीड शहरासह बाजाराच्या ठिकाणी धुडगूस घातला होता. त्यामुळे नागरिकांमधून या टोळीला अटक करण्याची मागणी होत होती. पोलीस अधीक्षक आर. राजा, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत यांचे पथक यासाठी नियुक्त केले. या पथकाने रविवारी रोहित काळेला शहरातील नाळवंडी नाका परिसरातून ताब्यात घेतले. त्याने अन्य दोघांच्या मदतीने गुन्हे केल्याची कबुली दिल्यावर प्रवीण नाडेला अटक केली. एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ९ मोबाइल व एक दुचाकी असा एक लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पकडलेल्या तिघांनाही शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.