- नितीन कांबळे कडा ( बीड) - बाजारपेठेत कांद्याची विक्रमी आवक होत असली तरी बाजारभाव नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. भाव नाही पण साठवणूक देखील परवड नाही. सडून जाण्यापेक्षा दोन पैसे मिळतील या आशेने शेतकरीकांदा विकत आहेत. मात्र, हजारो रूपये खर्च आणि प्रचंड मेहनत करूनही कांद्याने वांदा केल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. १७ गोण्या कांदा विकून केवळ एक रूपया हातात आल्याचे आष्टी तालुक्यातील बावी येथील शेतकऱ्याच्या बाबतीत घडले आहे.
आष्टी तालुक्यातील बावी येथील नामदेव पंढरीनाथ लटपटे यांनी मोठ्या कष्टाने कांदा पीक घेतलं. काढणी झाल्यानंतर दोन पैसे मिळतील म्हणून विक्रीसाठी लटपटे अहमदनगर येथील बाजारपेठेत घेऊन गेले. एकूण १७ गोण्याचे ८४४ किलो वजन भरले. दोन रूपये प्रतिकिलोचा भाव मिळाला. एकूण पट्टी १६८८ रूपये, यातुन १४६१ रूपये भाडे खर्च गेला,२२१ रूपये उचल गेली ,इतर खर्च ५ रूपये हे सगळे वजा होता हातात केवळ एक रूपया पडला. हजारो रूपये खर्च करून कांदा लागवड, मेहनत ,खत, औषध एवढा खर्च होऊन जर शेतकऱ्यांच्या मालाला सरकार भाव देत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करायचे. खर्च हजारात आणि एक रूपया हातात ही शेतकऱ्यांची थट्टा नाही तर काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शेतकऱ्यांची थट्टा थांबवातीन महिन्यापुर्वी २० गुठ्ठे क्षेत्रात कांदा लावला. ३० हजार खर्च झाला. अवघा दोन रूपये किलोचा भाव मिळाला अन् हातात एक रूपया आला. मायबाप सरकारने योग्य बाजारभाव द्यावा व होणारी थट्टा थांबवावी नाहीतर आम्हा शेतकर्यांपुढे टोकाचे पाऊस उचलण्या शिवायपर्याय नसल्याची भावना शेतकरी नामदेव लटपटे यांनी व्यक्त केली.