बीड - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यावेळी, गोपीनाथ मुंडेंची आठवण काढताना, गतवर्षी उमेदवान न उभा केल्याचं सांगितलं. माझ्या घराची चिंता मोदींना आहे. आम्ही सगळे भावंड जीवाभावाने वागतो. एकमेकांना साथ करतो. मोदींना घरादाराचं काय माहिती. हा एकटा गडी, असे म्हणत मोदींना सुनावले. मोदीसाहेब हे वागण बरं नव्हं, नको तिथं तोंड घालू नका, असेही पवार म्हणाले.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, एकदोनदा आम्ही गेलो त्यांच्या घरी, डोकावून बघितलं पण घरी कुणी दिसना. म्हणून हा एकटा गडी, त्याला घरासंबंधीची काय माहितीय हे मला माहित नाही ? पण दुसऱ्याच्या घरात डोकं वर काढून बघतो, असे म्हणत पवार यांनी मोदींचा समाचार घेतला. मोदींनी वर्धा येथील सभेत बोलताना, पवारांच्या कुटुंबात कलह असल्याचं म्हटलं होत. त्यावर, बोलताना पवार यांनी मोदींना लक्ष केलं.
गोपीनाथ मुंडे हे माझे सहकारी होते. मी विधिमंडळात नेता होतो, त्यावेळी ते विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे अनेकदा आमच्यात शाब्दीक संघर्ष होत होता. मात्र, वैयक्तिक पातळीवर कधीही टीक टीपण्णी केली नाही. त्यामुळेच, मुंडेंच्या मृत्यूनंतर आम्ही बैठक घेऊन निर्णय घेतला. जर, पोटनिवडणूक लागली अन् मुंडेंच्या कुटुंबातील सदस्य निवडणुकीला उभा राहिला. तर, आम्ही उमेदवार देणार नाही. त्यानुसार, आम्ही गेल्या निवडणुकीला उमेदवार दिला नाही. तर, गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर धनंजय मुंडेही त्याच जोमाने काम करत आहेत. मुंडेंची राजकीय परंपरा धनंजय मुंडे जोपासत असल्याचंही पवार यांनी म्हटलं.
मोदी माझ्यावर वैयक्तिक टीका करतात. पण, मी दिल्लीत भेटल्यावर मोदींना बोलणार आहे. मोदीसाहेब हे वागणं बरं नव्ह, नको तिथं तोंड घालू नका, असं त्यांना पार्लमेंटमध्ये भेटल्यावर सांगणार असल्याचंही पवार यांनी बीडमधील सभेत म्हटलं. तसेच मोदी हे आपल्या सभेत नेहरु आणि गांधी कुटुंबावर टीका करतात. जवाहरलाल नेहरु 9 वर्षे तुरुंगात होते. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु होते, बांग्लादेशची फाळणी करून इंदिरा गांधींनी जगाला भारताची ताकद दाखवून दिली. राजीव गांधीनी विज्ञानाचा आदर करुन लोकांच जीवन सहज सोप्प कसं करता येईल, हे पाहिल. आज आपण मोबईल वापरतो, खुरपणाऱ्या बाईकडंही मोबाईल फोन आहे. राजीव गांधींनीच हाच फोन आणला. पतीच्या हत्येनंतरही सोनिया गांधी देशात राहिल्या. देशाची धुरा त्यांनी सांभाळली. तर आज त्यांचा पुत्र तरुणांचे संघटन करत आहे. तरीही, हे मोदी म्हणतात काँग्रेसने 70 वर्षात काय केलं?, असे म्हणत पवारांनी मोदींना लक्ष्य केलं.