बीड : कोणतेही वाहन भाडेतत्त्वावर घ्यावयाचे असल्यास ते जास्तीत जास्त पाच वर्षे असणे आवश्यक आहे, परंतु प्रकल्प प्रेरणा विभागात वापरलेली जीप ही तब्बल १४ वर्षांपूर्वीची आहे. हे वाहन एनएचएममधील लेखापालाच्या नावावर आहे. केवळ सीईओंची दिशाभूल करून लेखापाल आणि प्रकल्प प्रेरणा विभागाचे नोडल ऑफिसर डॉ.सुदाम मोगले यांनी शासनाची फसवणूक केल्याचे यातून दिसत आहे.
जिल्हा रुग्णालयातील प्रकल्प प्रेरणा विभागाचा रोज एक नवा घोटाळा समोर येत आहे. अगोदरच खासगी व्यक्तीच्या नावावर असलेले वाहन क्रमांक दाखवून १४ लाख रुपये डॉ.मोगले यांनी स्वत: स्वाक्षऱ्या करून ढापले. त्यानंतर आणखी खोलवर जाऊन माहिती घेतली असता जे वाहन (एचएच १३ एसी २१८३) वापरले ते एनएचएममधील लेखापाल संतोष चक्रे यांच्या नावावर असल्याचे समजले. त्याचे वय पाहिल्यावर १४ वर्षे २ महिने एवढे आहे. शासन नियमानुसार शासकीय विभागात भाडेतत्त्वावर वाहन घ्यावयाचे असल्यास त्याचे वय ५ वर्षांपेक्षा जास्त असू नये, असा नियम आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्रही ऑक्टाेबर २०२० मध्ये काढलेले आहे, परंतु हे सर्व नियम धाब्यावर बसवून जुनी वाहने वापरून लाखोंची बिले उचलण्यात आली आहेत. यात नोडल ऑफिसर डॉ.मोगले यांच्यापासून ते लेखापाल व स्वाक्षऱ्या करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे दिसत आहे. आता त्यांच्यावर काय कारवाई होते, हे वेळच ठरविणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना दोन वेळा संपर्क केला, परंतु त्यांनी फोन घेतला नाही. तर एनएचएमचे जिल्हा व्यवस्थापक रवींद्र पवळ म्हणाले, वाहनांवर माझ्याकडे चार्ज आल्यावर बिले निघालेली नाहीत. या अगोदर किती बिले निघाली याची माहिती घेऊन सांगतो.
---
सीईओंना अंधारात ठेवून स्वाक्षरी
एमएच १३ एसी २१८३ हे वाहन अधिग्रहीत करताना त्याचे वय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापासून लपविण्यात आल्याचे उघड झाले आहे. १४ वर्षांचे वाहन आहे, असे सांगितले असते तर याला मान्यता मिळाली नसती, म्हणून त्यांना अंधारात ठेवून लेखापालाने ही प्रक्रिया केल्याचे सांगण्यात येत आहे. चक्रे यांनी पाया खोदला तर डॉ.मोगलेंनी कळस रचत १४ लाखांवर डल्ला मारल्याचे यावरून दिसत आहे.
--