अंबाजोगाई : फोनवरील संभाषणातून महापुरुष आणि एका विशिष्ट समाजाबद्दल कथितरित्या अपशब्द वापरणाऱ्या मोहन आचार्य याला पोलिसांनी शनिवारी रात्री उदगीर येथून ताब्यात घेतले असून त्याच्यावर अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन दिवसापासून सदरील संभाषणाची ऑडीओ क्लिप सोशल मिडीयावरून व्हायरल होऊन तणाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने ही कारवाई केली. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रशांत आद्नाक यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार, एका व्हाॅट्सॲप ग्रुपवर त्यांना हि ऑडीओ क्लिप मिळाली होती. त्यांनी ती ऐकली असता त्यात मोहन अंतराम आचार्य आणि रमेश नामदेव गडसिंगे या दोघांमधील फोनवरील संभाषण होते. या संभाषणात मोहन आचार्य याने महापुरुषांबद्दल आणि एका विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली. तसेच, भीमा-कोरेगाव दंगलीबाबत काही वादग्रस्त दावे करून दोन समाजात तेढ निर्माण करणारी भाषा त्याने वापरली होती. तर, रमेश गडसिंगे याने हि क्लिप सोशल मिडीयावरून व्हायरल केली. त्यामुळे, आचार्य आणि गडसिंगे यांनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार प्रशांत आद्नाक यांनी अंबाजोगाई शहर पोलिसात दिली. सदर तक्रारीवरून मोहन अंतराम आचार्य आणि रमेश नामदेव गडसिंगे या दोघांवर कलम २९५-अ, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक मुंडे करत आहेत. उदगीरमधून केली अटकदरम्यान, ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे त्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. पोलीस ठाण्यात काही संघटनांनी दोषींवर कडक कारवाईसाठी निवेदनेही दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अंबाजोगाई पोलिसांनी तातडीने कारवाई करत मोहन आचार्यला ताब्यात घेण्यासाठी यंत्रणा कामास लावली होती. अखेर शनिवारी रात्री आचार्यला उदगीरमधून ताब्यात घेण्यात आले. रविवारी दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे समजते. दुसरा आरोपी गडसिंगे हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संयम बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन याप्रकरणातील आरोपी मोहन आचार्य याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून शहरातील शांतता अबाधित ठेवावी. तसेच, कोणीही सदरील वादग्रस्त क्लिप इतरत्र फोरवर्ड करू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. शाहू महाराजांचा विचारांचा पाईक असल्याचा दिखावा ?मोहन आचार्य हा मागील काही वर्षापासून अंबाजोगाईत छत्रपती शाहू महाराज जयंती समारोह घेत असतो. शाहू महाराजांच्या विचाराचा पाईक असल्याचा हा केवळ त्याचा दिखावा होता अश्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. शाहू महाराजांच्या विचारसरणीला मानणारा व्यक्ती कुठल्याच समाजाबद्दल एवढा टोकाचा द्वेष बाळगू शकत नाही अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.
महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या मोहन आचार्यला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 1:49 PM