लोकमत न्यूज नेटवर्क
वडवणी : तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडवणी शहरातील मुख्य रस्ता व सार्वजनिक ठिकाणी अनेक दिवसांपासून मोकाट जनावरांची वर्दळ वाढली आहे. यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडत असून रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत.
वडवणी शहरातील आंबेडकर चौक, चाटे चौक, वसंत नाईक चौक व बीड-परळी हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक, साठे चौक, संभाजी चौक या परिसरात मोकाट जनावरांमुळे वाहनधारकांची भंबेरी उडत आहे. या भागात बैल, गाय, म्हैस, लहान वासरे हे मुख्य रस्त्यावर ठाण मांडत आहेत. यामुळे दुचाकी चालकांना छोट्या छोट्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील वयोवृद्ध नागरिकांना मोकाट जनावरांमुळे त्रास होत आहे.
....
कोंडवाडा उभारण्याची मागणी
मुख्य बाजारपेठेत जनावरांच्या झुंजी लागत असल्याने अनेकांची तारांबळ उडते. याचा महिला, लहान मुलांना त्रास होतो. तरी या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी व्यापाऱ्यांसह नागरिकांनी केली आहे. शहरातील मोकाट जनावरांना कोंडण्यासाठी कोंडवाडा उभारावा, अशी मागणी वडवणीकर करीत आहेत.
...