शिरूर कासार : नगरपंचायत कार्यालयाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचे अखेर पाऊल उचलले. जवळपास वीस जनावरे जप्त करून ताब्यात घेतली. यात गायी आणि वासरांचा समावेश आहे. ही जनावरं कोणी सांभाळण्यास तयार असतील तर रीतसर हमीपत्र घेऊन त्यांच्या ताब्यात दिली जाणार असल्याचे नगरपंचायत सूत्रांकडून सांगण्यात आले.
शहरात मोकाट जनावरांचा मोठा उपद्रव होता. तसेच ही जनावरे हंगामात शेतीलासुद्धा त्रासदायक ठरत होती. त्याअनुषंगाने यांचा बंदोबस्त करा, अशी मागणीही होत होती. नगरपंचायतकडून अनेक वेळा या जनावरांच्या मालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काहींनी आमची नसल्याचेही लेखी स्वरूपात देऊन हात व मालकी झटकली. अखेर नगरपंचायतीने ती पकडून जप्त करण्याची मोहीम हाती घेतली. आतापर्यंत जवळपास वीस जनावरे जप्त केली आहेत.
या जनावरांचे पुढे काय अशी विचारणा केली असता स्वखुशीने ही जनावरे सांभाळत असतील तर अटी, शर्तीनुसार हमीपत्र घेऊन त्यांच्या ताब्यात दिली जातील. या मोबदल्यात काही मिळणार नाही, ती विकता येणार नाहीत, परस्पर मूळ मालकाला सुद्धा देता येणार नाही, शिवाय चारा, पाणी, औषधी देखील स्वखर्चाने करावी लागणार, जनावराचा मृत्यू झाल्यास पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून पोस्टमार्टेम रिपोर्ट द्यावा लागेल अशी बंधने असल्याचे मुख्याधिकारी किशोर सानप यांनी सांगितले .शिवाय उर्वरित जनावरे देखील जप्त करण्यात येणार असल्याचेही सांगितले.
===Photopath===
180421\vijaykumar gadekar_img-20210418-wa0038_14.jpg