मोकाट गुरांचा रस्त्यावर ठिय्या
अंबाजोगाई : शहरातील सावरकर चौक ते शिवाजी चौक या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसलेली असतात. रस्त्याच्या मधोमध ही जनावरे बसत असल्याने रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. मुख्य रस्त्यावर वाहनांची वर्दळ व गुरांचा ठिय्या यामुळे वाहतूक व्यवस्था अनेकदा कोलमडते. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन गुरांना रस्त्यातून हटवावे. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
लघु प्रकल्पांची दुरुस्ती रखडली
अंबाजोगाई : जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्यावतीने अंबाजोगाई तालुक्यातील अनेक लघु प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. अनेक छोटी व मोठी कामे या माध्यमातून व्हावीत. अनेक प्रकल्पांना गेट बसविणे, गेटची दुरुस्ती अशा कामांसाठी निधींची मागणी करण्यात आली. मात्र, अद्यापही निधी प्राप्त न झाल्याने दुरुस्तीची कामे रखडली आहेत.
आठ दिवसांआड पाणीपुरवठा
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तरीही अंबाजोगाई शहरातील नागरिकांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्याचे कसलेही वेळापत्रक नगर परिषदेकडे उपलब्ध नसल्याने वेळी-अवेळी केव्हाही पाणी सोडले जाते. कोणत्याच प्रभागाचा पाणी सोडण्याचा दिवस ठरलेला नसल्याने मनमानीपणे पाणी सोडले जाते. मुबलक पाणीसाठा असूनही आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
महावितरण बिलाचा ग्राहकांना शॉक
अंबाजोगाई : तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरणकडून दिली जाणारी बिले अव्वाच्या सव्वा प्रमाणात देण्यात आली आहेत. कोणत्याही विद्युत पंपाला मीटर नसल्याने देण्यात येणारी बिले अंदाजाने देण्यात येतात. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे कमी अश्वशक्तीच्या विद्युत मोटारी आहेत. अशा शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात वीजबिले आली आहेत. महावितरणच्या या वीजबिलाच्या शॉकने वीजग्राहक त्रस्त झाले आहेत.
श्वानांना चर्मरोग लागणमुळे भीतीचे वातावरण
अंबाजोगाई : शहर व परिसरात अनेक प्रभागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या श्वानांच्या वाढत्या संख्येचा मोठा त्रास शहरवासीयांना होत आहे. मुख्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेले हे श्वान रहदारी करणाऱ्या व्यक्तींना भीतीदायक ठरू लागले आहेत. यातील अनेक श्वानांना चर्मरोगाची लागण झाल्याने ते भिंतीला अंग घासत बसलेले असतात. याचा शहरवासीयांना मोठा त्रास होऊ लागला आहे. या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.