बीड : अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने तुळशीराम नागरगोजे यास ५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि २० हजार रुपये दंड येथील विशेष सत्र न्यायालयाने ठोठावला.पाटोदा तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन विनयभंग केल्याचा तुळशीराम महादा नागरगोजे याच्यावर आरोप होता. या प्रकरणी पीडितेच्या आजीने पाटोदा पोलीस ठाण्यात १६ फेब्रुवारी २०१५ रोजी तुळशीराम नागरगोजेविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पाटोदा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध ३६३, ३६६ (अ) व बाललैंगिक अत्याचार कायद्याच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंद झाला होता.पाटोदा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. राठोड यांनी या प्रकरणाचा तपास करुन आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र बीड येथील विशेष सत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयाने तुळशीराम महादा नागरगोजे यास बाललैंगिक अत्याचार कायद्याच्या कलम ८ नुसार ५ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, कलम ३६३ भादंविनुसार २ वर्षे शिक्षा व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता मंजुषा दराडे यांनी काम पाहिले. या प्रकरणात त्यांना तपासी अधिकारी एस. एम. राठोड तसेच कोर्ट पैरवी अधिकारी आर. बी. मोरे, एस. बी. जाधव, एन. वाय. धनवडे यांनी सहकार्य केले.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ५ वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 11:52 PM