लोकमत न्यूज नेटवर्कबीड : घरासमोर बसलेल्या शिक्षकास साक्षीदार देण्याच्या कारणावरून तलवारीने वार केले. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या गावातील एका महिलेचा विनयभंग केला. आणखी एका रिक्षावरही दगडफेक केली. ही घटना आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे रविवारी सांयकाळी घडली. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
धामनगाव येथील शिक्षक सुभाष बाबूराव बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार चार महिन्यांपूर्वी धामणगाव येथील साहेबराव घाटविसावे यांच्या मुलाने फाशी घेतली होती. याप्रकरणी रावसाहेब लोखंडे, ऋषिकेश लोखंडे, आकाश काळे, जब्बार पठाण आणि रियाज पठाण यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद आहे. यापैकी ऋषिकेश लोखंडे याचा मित्र सुनील शिंदे हा सुभाष बोराडे यांचा भाचा आहे. त्यामुळे साहेबराव घाटविसावेची मुले विनोद आणि फिलीप उर्फ फिल्या हे सतत बोराडे यांच्याकडे भाच्याबाबतीत विचारणा करत असत आणि धमकावत असत.
रविवारी सायंकाळी ५.३० वाजता सुभाष बोराडे त्यांच्या कुटुंबियांसहित घरासमोर बोलत बसले होते. यावेळी विनोद साहेबराव घाटविसावे आणि फिलीप उर्फ फिल्या साहेबराव घाटविसावे हे दोघे भाऊ तिथे आले आणि सुनील शिंदे बद्दल विचारपूस करू लागले. त्याच्याबद्दल माहीत नसल्याचे सांगताच घाटविसावे बंधूंनी सुभाष बोराडे यांच्या मानेवर तलवारीने वार केला, परंतु बोराडेंनी तो हातावर झेलला. यावेळी भांडणे सोडविणाºया बोराडेंच्या आईलाही लाकडी दंडुक्याने मारहाण करण्यात आली.
तेवढ्यात साहेबराव घाटविसावे याने देखील तिथे येत ‘एक एकाला मारून टाका’ असे मुलांना भडकविले. यावेळी गावातील लोक येताना दिसल्याने घाटविसावे बंधू आणि पिता निघून गेले. त्यानंतर त्यांनी आणि लखन गायकवाड यांनी बाळू शंकर पवार यांना मारहाण करून त्यांच्या टेंपोच्या काचा फोडल्या आणि खिशातील ६ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर हे सर्व आरोपी तसेच ग्यानबा साळवे व संदीप जाधव यांनी अल्ताब निजाम पठाण यांच्या तीन रिक्षांच्या काचा फोडल्या आणि कुटुंबातील महिलांचा विनयभंग केला. त्यानंतर घरावर दगडफेक करत आरोपी निघून गेले. पुढे जाऊन त्यांनी इतर काही महिलांचा विनयभंग केला, असे सुभाष बोराडे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी बोराडे यांच्या तक्रारीवरून विनोद साहेबराव घाटविसावे, फिलीफ उर्फ फिल्या घाटविसावे, साहेबराव घाटविसावे, संदीप जाधव, लखन गायकवाड, गोरख घाटविसावे आणि ग्यानबा साळवे (सर्व रा., धामणगाव ता. आष्टी) या सात आरोपींवर अंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक बारवकर हे करीत आहेत.