बीड : शासनाच्या निर्देशानुसार २७ जानेवारीपासून ५वी ते ८वीचे वर्ग असणाऱ्या शाळा सुरू होत आहेत. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसल्याने शाळेबाबत पालकांमध्ये संमिश्र सूर आहे. बहुतांश पालक मुलांना शाळेत पाठविण्यासाठी सकारात्मक दिसून येत आहेत, तर काही पालक अजूनही संभ्रमात आहेत. काही पालक तर मुलांची काळजी कोण घेणार? असा सवाल करीत स्पष्ट नकारही दर्शवित आहेत. एकीकडे पालकांची अशी मनस्थिती असताना मात्र विद्यार्थ्यांमध्ये शाळेत जाण्याबाबत उत्सुकता व कुतुहल आहे. तोंडाला मास्क लावणार, सॅनिटायझर वापरणार, सोशल डिस्टन्स ठेवून काळजी घेणार? पण शाळेत जाणार असल्याचे बहुतांश विद्यार्थी सांगत आहेत. काही विद्यार्थी पालक म्हणतील तर शाळेत जाणार अशा प्रतिक्रिया देत आहेत. काही विद्यार्थी मात्र कोरोनाची भीती व्यक्त करत शाळेत जाणार नसल्याचे सांगत आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांनी मात्र आई मला शाळेत जाऊ दे ना, अशी गळ घातली आहे. मागील काही दिवसांपासून शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार शिक्षकांची कोरोना चाचणी सुरू आहे. २३ जानेवारीपर्यंत १५६२ ॲन्टीजेन व आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३५ शिक्षक कोरोनाबाधित आढळले आहेत, तर शंभरहून जास्त अहवाल प्रलंबित आहेत. विद्यार्थी मात्र घरातून बाहेर पडण्यास उत्सुक असून, शाळेत जाण्यासाठी तयारी करीत आहेत. विद्यार्थी संख्या
पाचवी ५३०२५
सहावी ५१७४३
सातवी ५१२२८
आठवी ४९५४०
-------
वर्ग सुरू करण्यासाठी सूचनेनुसार शाळांकडून शिक्षकांची कोरोना चाचणी, परिसर स्वच्छता, वर्गखोल्यांसह शाळेत निर्जंतुकीकरण, थर्मलगन, ऑक्सिमीटरची खरेदी सुरू आहे. पालकांच्या संमतीपत्राचा विहीत नमुना तयार करून त्याचे वाटप सुरू आहे. यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात येत असून, तसे नियोजन केले जात आहे.
------
विद्यार्थी सांगतात कारणे
खूप दिवस झाले, दिवसभर मोबाईल, टीव्हीमुळे घरी कंटाळा आला. मित्र - मैत्रिणींची भेट होईल. मास्क वापरला तर काहीच होणार नाही.
ऑनलाईन समजत नाही, कधी मोबाईल बाबा घेऊन जातात, तर वापरला तर हँग होतो. शंकांचे समाधान होत नाही.
परीक्षा जवळ आल्या आहेत.
अभ्यास तर करणार पण शाळेत गेलो तर लवकर समजेल. सरांनी, शाळेने आमची काळजी घ्यावी, नियमांचे पालन करू.
----
काही विद्यार्थ्यांनी काळजी करू नका म्हणत पालकांची संमती घेत पत्रावर स्वाक्षरी मिळविली. नववी ते बारावीचे वर्ग सुरक्षित सुरू झाल्याने पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची ओढ लागली आहे.
----
आमची तयारी पाहून पालकही समाधानी आहेत. मास्क, पाणी बॉटलची खरेदीची लगबग सुरू आहे.
आई- बाबा नको म्हणतात, काही दिवस वाट पाहा म्हणतात.
---
विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
शाळेत गेले तर शिकवलेले समजेल. ८-९ महिने झाले, मला वाटते आता शाळा सुरू झाल्या पाहिजेत. आई- वडील काहीच म्हणाले नाहीत. शाळेत शिकवले तर परीक्षेची तयारी करता येईल. मी शाळेत जाणार आहे. - प्रेरणा शिवाजी परळकर, इयत्ता ८ वी.
---------
सगळेच शाळेत नाही जाणार म्हटल्यावर कसे होणार? खूप दिवस झाले, शाळेत जायचंय. घरी अभ्यास होत नाही. शाळेत गोडी लागेल. मास्क लावणार, सॅनिटायझर वापरणार, शाळेत जाणार.- दीपाली दीपक पेंढारे, इयत्ता सातवी.
-------------
मी शाळेत जाणार आहे. शाळेत स्वतंत्र बाक असेल, एकदिवसाआड शाळा राहणार आहे. सरांनी, बाईंनी काळजी घेतली पाहिजे. आई- बाबांना विचारले आहे. -- श्रव्या दिलीप पुल्लेवाड, इयत्ता सहावी.
------
------