पुरुषोत्तम करवा माजलगाव (जि. बीड) : तालुक्यातील लवुळ येथे मागील एका महिन्यापासून वानरांनी धुमाकूळ घातला आहे. ही वानरे गावात कुत्र्याचे पिल्लू दिसले की त्यास उचलून घेऊन उंच ठिकाणावरून त्या पिलांना ढकलून देत त्यांचा बळी घेत आहेत. या वानरांनी आतापर्यंत सुमारे २५० कुत्र्यांचा बळी घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. याकडे मात्र वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे.
माजलगावपासून दहा किलोमीटर अंतरावर लवुळ हे पाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. या ठिकाणी मागील एक महिन्यापासून ही वानरे कुत्र्यांची पिल्ले उचलून घेऊन जात आहेत. कुत्र्यांच्या पिल्लांना उंच झाडावर किंवा घरावर नेऊन त्या ठिकाणांवरून फेकून देत आहेत. आतापर्यंत या वानरांनी सुमारे २५० पेक्षा जास्त कुत्र्यांचा पिल्लांचा बळी घेतला असल्याचे गावकरी सांगतात.
याबाबत येथील ग्रामपंचायतीने धारूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते केवळ एक दिवस आले. थोडावेळ त्या वानरास पकडण्याचा प्रयत्न केला. पण वानर पकडता न आल्याने ते निघून गेले. त्यानंतर ते इकडे फिरकलेदेखील नाहीत.
कुत्र्यांनी मारले होते वानराचे पिल्लू या वानरांच्या एका पिल्लाला लवुळ गावातील कुत्र्यांनी काही दिवसांपूर्वी मारून टाकले होते. यामुळे रागाच्या भरात ही वानरे गावातील कुत्र्यांच्या पिलांना मारून टाकत आहेत, असे येथील ग्रामस्थ सांगतात.
अनेक जण जखमीलवुळ गावातील सीताराम नायबळ यांच्या कुत्र्याच्या पिलाला १५ दिवसांपूर्वी वानर घेऊन गेले होते. नायबळ यांनी गच्चीवर जाऊन पिल्लाला सोडविण्याचा प्रयत्न केला असता वानर त्यांच्या अंगावर धावून आले. त्यात नायबळ गच्चीवरून खाली पडले आणि त्यांचा पाय मोडला. याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत.
आता लहान मुले टार्गेट गावातील कुत्र्यांच्या पिल्लांची संख्या कमी झाल्याने आता वानरांनी आपला मोर्चा लहान मुलांकडे वळवला आहे. संतराम शिंदे यांच्या आठ वर्षांच्या नातवाला वानराने उचलून पत्र्यावर नेले होते. नागरिकांनी दगड व काठ्या उगारल्याने बालकास सोडून पळून गेले. ही वानरे शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांच्या पाठीमागे लागत असून काही महिलांना त्याने मारल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत, असे पंचायत समितीचे माजी सदस्य राधाकिसन सोनवणे यांनी सांगितले.