शिरूर कासार : येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धेश्वर संस्थानवर गेल्या बारा महिन्यांपासून पौर्णिमा वाऱ्या कोरोनामुळे बंद झाल्या आहेत. परिणामी, महिन्याला संस्थानवर होणारे कीर्तन आणि अन्नदानसुद्धा बंद ठेवावे लागले. कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत व शासन परवानगी देईपर्यंत ही वारीची परंपरा बंद ठेवावी लागणार असल्याचे संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी सांगितले.
गायीसाठी चारादाते वाढले
शिरूर कासार : येथील सिद्धेश्वर संस्थानवर महंत स्वामी विवेकानंद शास्त्री हे गायींचा सांभाळ करत असून त्यांनी चारा देण्याचे आवाहन केले होते. त्याला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे. भाऊसाहेब प्रभाकर गाडेकर यांनीदेखील गायीसाठी चारा म्हणून शेतातील सरमाड पोहोच करून गोसेवेला हातभार लावला आहे. सध्या सर्वच शेतकऱ्यांकडे चारा उपलब्ध असल्याने प्रत्येकाने या सेवाधर्मात सहभाग घेण्याचे पुन्हा आवाहन केले आहे.
कोरोना रुग्णांमध्ये घट होईना
शिरूर कासार : सध्या कोरोना रुग्णांत बऱ्यापैकी घट होताना दिसत असली तरी जिल्ह्यातील आकडा पाहिजे तेवढा कमी होत नसून शिरूर तालुक्यात सुद्धा हा आकडा पन्नाशीच्या खाली आलेला नाही. कोरोनासंदर्भात गाफील राहू नये, काळजी घेणे जरूरी असल्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
बांधकाम मिस्त्री व्यस्त
शिरूर कासार : सध्या सर्वत्र बांधकामाची धूम सुरू असल्याने बांधकाम मिस्त्री व्यस्त दिसून येतात. किरकोळ कामाकरिता तर कुणाला फुरसतच नसल्याचे चित्र दिसून येते, डागडुजीसारखी कामे करणे अवघड झाले आहे.
उन्हाचा पारा होतोय असह्य
शिरूर कासार : तालुक्यात मे महिन्याच्या अंतिम चरणात उन्हाचा चढता पारा आता असह्य होत आहे. आधीच लाॅकडाऊन आणि त्यात उन्हाचे चटके बसत असल्याने दुपारी रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.