आष्टी : तालुक्यातील अनेक शेतक-यांची पीक कर्ज प्रकरणे प्रलंबित असून खरीप हंगाम संपलेला असून रबी हंगामही संपला आहे. तरी अद्यापपर्यंत पीक कर्ज प्रकरणे मंजूर न केल्याने व बँकेकडून शेतक-यांना व्यवस्थित वागणूक मिळत नसल्याने १२ फेबुवारी रोजी शेतकऱ्यांसह माजी आ. भिमराव धोंडे यांनी मोर्चा काढला. यावेळी शेतक-यांचे कर्ज प्रकरणे आठ दिवसांत मंजूर करा अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा धोंडे यांनी बँक व्यवस्थापकांना निवेदनाव्दारे दिला. शाखेच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी पीक कर्ज प्रकरणे आपल्या शाखेत एक वर्षापासून सादर केले असून अद्यापपर्यंत मंजूर नाहीत, याबाबत शेतक-यांनी विचारणा केली असता बँकेतील फिल्ड ऑफिसर उडवाउडवीची उत्तरे देत अरेरावीची भाषा वापरत असल्याची बाब यावेळी निदर्शनास आणून देण्यात आली. शेतकरी व इतर ग्राहकांची प्रलंबित प्रकरणे येत्या आठ दिवसात मंजूर करावेत अन्यथा बँकेसमोर तीव्र आंदोलनाचा इशारा माजी.आ.भीमराव धोंडे यांनी दिला आहे. यावेळी शंकर देशमुख, रघुनाथ शिंदे,बाबासाहेब गर्जे, संभाजी झांबरे,बाबु कदम,सदाशिव गर्जे, संजय काळे, बाबा गर्जे, अशोक मिसाळ, रामनाथ मिसाळ, नामदेव गर्जे, सोन्याबा गावडे, छगन तरटे, अण्णासाहेब लांबडे, सुरेश दराडे, बाबा खलाटे, रावसाहेब कुत्तरवाडे, सुदाम झिंजूर्के,सोपान चौधार यासह आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पीक कर्जप्रकरणी आष्टीत बँकेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:32 AM