अंबाजोगाई :
जाचक अटी शिथिल करून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामधील बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने मागील दहा दिवसांपासून बदली कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकारने याची कुठलीच दखल घेतली नाही. यामुळे पुरुष बदली कर्मचाऱ्यांनी डोक्यावरील केस मुंडन व अर्धनग्न होत गुरुवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ९ जुलै १९९९ रोजी दिलेल्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून सन २००० मध्ये १९ बदली कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले. न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ज्येष्ठता यादी तयार करून रिक्त जागेवर २९ दिवसांच्या तत्वावर आजतागायत आदेश मिळत आहेत. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होत आहे. परंतु, रिक्त असलेल्या पदांवर कायम केले जात नाही. न्यायालयीन आदेशानुसार तयार केलेल्या जेष्ठता यादीतील उर्वरित २१४ कर्मचाऱ्यांना २९ दिवसांच्या तत्वावर कोरोना, सारी, महाभयंकर व इतर रोगांच्या साथीमध्ये आवश्यकतेनुसार कामावर घेतले. त्यांनी रुग्णांची सेवा केली. मात्र, १९८० पासून कार्यरत बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केलेले नाही. वेळोवेळी शासनाच्या आरोग्य विभागाकडून निघणाऱ्या अटींना कंटाळून बदली कर्मचारी आत्महत्येचा मार्ग अवलंबित आहेत. १० वर्षे व २४० दिवस भरले पाहिजेत, ही जाचक अट शिथिल करून बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, या मागणीसाठी ३० वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बदली कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने गुरूवारी विलास काळुंके, शेख जमीर, दिलीप गालफाडे, सिमरन बक्ष, पुष्पा कचरे, ऊर्मिला शिंदे, प्रकाश कसबे, अशोक गायकवाड यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला.