लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी :
आष्टी, पाटोदा, शिरूर नगरपंचायतीला राज्यात सर्वाधिक घरकुले मंजूर आहेत. शिरूर शहराचे २ कोटी ९८ लाख रुपये सोमवार किंवा मंगळवारी घरकुल लाभार्थ्यांना मिळतील. आष्टी, पाटोदा शहरांच्या दोन आठवड्यांत लाभार्थ्यांना मिळणार आहेत. यामुळे घरकुल लाभार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी शनिवारी येथे माध्यमांशी बोलताना केले.
प्रधानमंत्री घरकुल योजनेचा राज्याचा हिस्सा खर्च झाला असून निधीसाठी केंद्राकडे मागणी केली होती. तो निधी प्राप्त झाला आहे. शिरूर शहरासाठी २ कोटी ९८ लाख २ दिवसांत जमा होतील. केंद्राकडून हा पैसा आलेला आहे. दोन आठवड्यांत आष्टी, पाटोदा शहरांतील घरकुल लाभार्थ्यांना मिळून जाईल, असेही त्यांनी सांगितले.
....
कामापेक्षा डिंडोराच पिटवला जातो
स्व. गोपीनाथराव मुंडे महामंडळासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु, त्यांचा कामापेक्षा जास्त डिंडोरा पिटवला जात आहे. कायदा मंजूर होणे आमची मागणी आहे. परंतु, जिल्ह्याचे सामाजिक न्यायमंत्री असताना आम्हाला न्याय देऊ शकले नाहीत, अशी टीकाही पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता धस यांनी केली. अजूनही वेळ गेलेली नाही. तत्काळ कायदा करावा, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे, असेही ते म्हणाले.
....
आष्टीच्या पाणीयोजनेला मंजुरी
आष्टी शहरासाठी आनंदाची बाब म्हणजे आष्टी शहराच्या २२ कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. मेहकरी प्रकल्पातून शहराला शुद्ध, स्वच्छ पाणी पुरविण्याचा आमचा मानस आहे, असेही धस यांनी सांगितले.