बीड : चारित्र्याचा संशय व कौटुंबिक कलहातून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना शहरातील मोमीनपुरा भागातील मासूम कॉलनीत ११ सप्टेंबर रोजी घडली होती. आई जिवानिशी गेली. तिच्या हत्येच्या आरोपाखाली पित्याला अटक झाली. त्यामुळे तीन निरागस भावंडे जन्मदात्याच्या प्रेमाला पारखी झाली.
मल्लिका याकूब शेख (वय ३८) असे मयत विवाहितेचे नाव असून, शेख याकूब शेख खुदबुद्दीन याने
११ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान गळा आवळून व उशीच्या साहाय्याने तोंड दाबून खून केला होता. त्यांच्यात सतत वाद होत. शिवाय शेख याकूब चारित्र्यावर संशय घेत होता. यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या दाम्पत्यास तीन मुले आहेत. समीर (१०), रावसू (८) व हर्ष (६) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी समीर आजी-आजोबांकडे राहायचा तर इतर दोघे आई-वडिलांसोबत असत. ११ रोजी सायंकाळी दोन भावंडे बाहेर खेळण्यास गेली होती. घरी पती- पत्नी दोघेच होते. मल्लिकाला संपवून याकूब याने घराला बाहेरुन कुलूप लावून थेट पेठ बीड ठाणे गाठून घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. रात्री उशिरा मल्लिकाची बहीण शेख रिजवाना शेख नजीमुल्ला ऊर्फ बाबा (रा. मोहंमदीया कॉलनी) यांच्या तक्रारीवरुन पती शेख याकूबविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
१२ रोजी शेख याकूबला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक निरीक्षक सुभाष दासरवाड यांनी दिली.----
प्रेमाचा शेवट वाईट!
मयत मल्लिका व शेख याकूब यांनी आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. याकूब बिगारी काम करायचा तर मल्लिका घरीच असायची. संशय व कौटुंबिक वादाचे पर्यवसान मल्लिकाच्या खुनात झाले. त्यामुळे तीन निरागस भावंडे आई-वडिलांना पोरकी झाली. आता ते तिघेही आजी-आजोबांच्या आश्रयाला आहेत. प्रेमाचा शेवट वाईट झाल्याने कुटुंब व नातेवाईक सुन्न झाले आहेत.