- प्रभात बुडूख
बीड : एचआयव्ही किंवा एड्स आहे, असे कळल्यानंतर समाज त्या मुलांना व लोकांना स्वीकारण्यास तयार होत नाही. अशी मुलं आमच्या ‘इन्फंट इंडिया’आनंद वन येथे येतात. काही जण औषधोपचाराला प्रतिसाद देत सुदृढ जीवन जगतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच असतो, तर काही मुलांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे इथे आल्यानंतर देखील उपचारास योग्य प्रतिसाद देत नाहीत. त्यांचे हळूहळू संपत जाणारे आयुष्य हेही याच डोळ्याने पाहावे लागते. त्यामुळे मागील १२ वर्षापासून आनंद आणि यातना देणारे मातृत्व आपण जगत असल्याची भावना सामाजिक कार्यकर्त्या संध्या दत्ता बारगजे यांनी व्यक्त केली.
बीड तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरणाच्या समोरील डोंगराच्या कुशीत संध्या व दत्ता बारगजे या दाम्पत्याचा संसार उभा आहे. संस्थेमध्ये आजघडीला ६८ ते ७० एचआयव्हीग्रस्त मुलं-मुली व काही महिला वास्तव्यास आहेत. संस्थेचा व्याप वाढला आहे आणि हे वाढणेच आम्हाला वेदना देणारे आहे. हा आजारच समूळ नष्ट होऊन संस्थेमधील मुलांची संख्या कमी व्हावी, अशीच आमची भावना असल्याचे संध्या बारगजे म्हणाल्या. या मुलांसाठी काम करण्याची प्रेरणा बाबा आमटे तसेच मंदा व प्रकाश आमटे यांच्यापासून मिळाली, असे सांगून त्या म्हणाल्या, माझे लग्न १९९८ साली दत्ता बारगजे यांच्याशी झाले. आमची परिस्थिती बेताचीच होती. दत्ता बारगजे यांना ‘लेप्रसी टेक्निशियन’ म्हणून भामरागड येथे नोकरी मिळाली. या कालावधीत बाबा आमटे यांच्याशी आमचा संबंध आला. त्यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा व्हायची. त्यांचे कुष्ठरोग्यांप्रतीचे कार्य पाहून आपण देखील इतरांचे दु:ख कमी करण्यासाठी काही तरी करावे, असे आम्हा दोघांच्याही मनामध्ये येत होते. त्यावेळी मी समाजशास्त्र विषयात एम.ए.ची पदवी घेतलेली होती त्यामुळे भामरागड येथे शिक्षिकेची नोकरी करत होते.
त्यानंतर पती दत्ता बारगजे यांची बदली बीड येतील जिल्हा रुग्णालयात झाली आणि आम्ही बीड येथे राहण्यासाठी आलो, त्यानंतर देखील मन स्वस्थ बसू देत नव्हते. अनेक वेळा आमटे कुटुंब करत असलेले समाज कार्य डोळ््यापुढे येत होते. तीच प्रेरणा घेऊन २६ जानेवारी २००७ रोजी बीड शहरातील राहत्या घरी एचआयव्हीग्रस्त अनाथ मुलांचा सांभाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी घरातील व्यक्ती व शेजाऱ्यांकडून त्रास सहन करावा लागला. या कारणामुळे अनेक वेळा घरे देखील बदलावी लागली. मात्र, या मुलांच्या यातनांसमोर आमच्या समस्या फार मोठ्या नव्हत्या. कारण या सहारा नसलेल्या मुलांची माय होण्याचे मी ठरवले होते. पुढे हा प्रवास वाढत गेला. संस्थेचा डोलारा वाढला. समाजातील विविध स्तरांतून मदतीचा ओघ वाढला व या मुलांना सकस आहार, औषधोपचार व शिक्षण संस्कार देऊन जीवनमान उंचावण्यासाठी व समाजात वेगळे स्थान देण्यासाठी आम्हाला काम करता येऊ लागले... संध्या बारगजे सांगत होत्या.
कळ््या कोमेजणार नाहीत याची काळजी घ्यायला हवीआई होणे सोपं आहे, वेदनेची आई होणं कठीण आहे. परंतु रोजच्या जगण्यातील संघर्ष करताना या मुलांच्या चेहऱ्यांवरील आनंद पाहून काम करण्याची उर्मी वाढते. संस्थेमध्ये २ ते १८ वर्षाची ६८ ते ७० मुले व समाजाने न स्वीकारलेल्या काही महिला वास्तव्यास आहेत. त्यांचे आयुष्य वाढावे यासाठी मुलांना नेहमी आनंदी ठेवतो. आई म्हणून या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद देता येईल. पण भविष्याची जडणघडण समाजाने करायची आहे. त्यामुळे सर्वांनी यांचा स्वीकार करुन या कळ््या कोमेजणार नाहीत, यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे असे संध्या बारगजे म्हणाल्या.
पाच मुलांचा सुखी संसार संस्थेतील ५ मुली व मुलांचा विवाह झाला आहे. ते आपल्या पायावर उभे राहून संसार करत आहेत. त्यांचे आई वडील होऊन मुलीला सासरी पाठवणे यापेक्षा मोठा आनंद आमच्यासाठी नव्हता. आम्ही सांभाळ केलेल्या पहिल्या मुलाचा विवाहानंतर जन्मलेला मुलगा शिव हा निगेटिव्ह झाला आहे. त्यामुळे आमच्या संस्थेतील इतर मुलांच्या देखील आशा पल्लवीत झाल्या आहेत. शिव हा आमचे रोल मॉडेल असून आजी-आजोबा झाल्याचे सुख त्याच्याकडून आम्हाला मिळते, असे बारगजे दाम्पत्य म्हणाले.