लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेवराई येथील उपजिल्हा रूग्णालयात महिलेची प्रसुती झाल्यानंतर तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र, प्रसुतीनंतर अवघ्या काही तासांतच तिचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. यामध्ये डॉक्टरांनी हलगर्जी केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखून धरले होते. दरम्यान, यातील बाळ सुखरूप असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दीपाली अमोल शिंदे (२२, रा.मन्यारवाडी, ता.गेवराई) असे मयत मातेचे नाव आहे. दीपाली यांना मंगळवारी दुपारी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. तीन वाजेच्या सुमारास त्यांची प्रसुती झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्मही दिला. बुधवारी पहाटेच्या सुमारास दीपाली यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, येथे येण्यापूर्वीच रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासणी करून मयत घोषीत केले.दरम्यान, गेवराई रूग्णालयातील डॉक्टरांनी सिझर झाल्यानंतरही उपचाराच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टरांविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी लावून धरत नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखून धरले. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रूग्णालय चौकीतील पोलिसांनी गेवराई पोलिसांना हा प्रकार कळवला. गेवराई पोलिसांनी धाव घेत नातेवाईकांची समजूत घातली. त्यानंतर उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांनी अंत्यविधीसाठी नेला. दरम्यान, मागील काही दिवसांपासून डॉक्टरांवरील आरोप वाढले आहेत.
दोषींवर कारवाई केली जाईलमाता मृत्यूची सर्व माहिती घेतली आहे. याबाबत आताच काही बोलणे उचित नाही. याचे सर्व कागदपत्रे मागवून घेत चौकशी केली जाईल. डॉक्टर दोषी असतील तर कारवाई केली जाईल.- डॉ.सुखदेव राठोडप्र.जिल्हा शल्य चिकित्सक, बीड