रॉकेलचा गैरवापर; पुरवठा विभागाचे दुर्लक्ष
गेवराई : गरिबांसाठी स्वस्त धान्य दुकानांवरील रॉकेल काळ्या बाजारात जात असून, त्याचा वापर वाहनांसाठी केला जात आहे. यामुळे प्रदूषण वाढत आहे, तर दुसरीकडे शिधापत्रिकाधारकांना रॉकेल मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. परंतु, महसूल प्रशासनाकडून अद्यापही याकडे लक्ष न दिल्यामुळे रॉकेलचा गैरवापर सुरूच आहे.
पर्यावरणास धोका; कारवाईची मागणी
माजलगाव : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदाकाठच्या नदीपात्रांमध्ये दिसत आहे. कारवाईची मागणी नागरिकांतून केली जात आहे. महसूल, पोलीस प्रशासनाचा वचक न राहिल्याने वाळू उपसा सुरूच आहे.
अपघातास निमंत्रण
बीड : शहरातील अण्णा भाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरनाका या भागात वाहतूक शाखेच्या पोलिसांसमोरच अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. रिक्षा, जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
योजनेला हरताळ
अंबाजोगाई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून गावोगावी गरीब लाभार्थ्यांना अन्न पुरवठा स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून होतो. पुरवठा होत असलेला गहू, तांदूळ हा हलक्या दर्जाचा आहे. अशा तक्रारी करूनही याकडे लक्ष दिले जात नाही. तक्रारीकडे पुरवठा विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.