- दीपक नाईकवाडे
निवडुंगवाडी (ता. बीड) : बाहेरगावी वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीस असलेले तिघेजण गावाकडे दीपावलीच्या सणासाठी एकत्रित आले. सण साजरा केल्यानंतर सुट्या संपत आल्याने देवदर्शनासाठी मुंडे कुटुंबीय पाटोदा तालुक्यात जात असताना त्यांच्या जीपला अपघात झाला. या अपघातात मुंडे कुटुंबातील सात जण ठार झाल्याची वार्ता सोमवारी सकाळी धडकताच निवडुंगवाडी गावावर शोककळा पसरली.
बीड तालुक्यातील निवडुंगवाडी येथील पंढरी मुंडे यांना रामचंद्र, बाळू , बन्सी व भीमराव हे चार मुले. हे कुटुंब गावात एकत्रितपणे राहते. पंढरी मुंडे यांचा मुलगा रामचंद्र यांचा वीस वर्षापूर्वी बस अपघातात मृत्यू झाला होता. या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती असून भीमराव व बन्सी हे साखर कारखान्यावर मुकादम म्हणून काम करतात. बाळू पंढरी मुंडे हे वजन मापे निरीक्षक म्हणून राहुरी (जि. अहमदनगर) येथे कार्यरत होते तर रामचंद्र यांचा मुलगा अशोक रामचंद्र मुंडे (२६) हा औरंगाबाद येथे केमिकल कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करत होता. बन्सी मुंडे यांचा मुलगा शरद हा नंदुरबार येथे पोहेकॉ. म्हणून नोकरीस होता तर भीमराव मुंडे यांचा मुलगा सतीश हा ठाणे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस होता. ही सर्व मंडळी जीपमधून देवदर्शनासाठी जात होती. तर सतीश मुंडे हे जीप चालवत होते. ते आणि लहान मुलगी सई सतीश मुंडे हे जखमी आहेत.
मुंडे कुटुंबातील सात जणांचा मृत्यूसुट्या संपत आल्याने सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास सतीशच्या मालकीच्या जीपमधून अशोक रामचंद्र मुंडे, बाळू पंढरी मुंडे (वजन मापे निरीक्षक), केशरबाई पंढरी मुंडे व त्यांचा मुलगा शरद पंढरी मुंडे (पोलीस कॉन्स्टेबल), भीमराव यांच्या पत्नी आसराबाई भीमराव मुंडे व त्यांचा मुलगा सतीश भीमराव मुंडे (शिक्षक), त्याची पत्नी जयश्री व मुलगा सोहम (७), मुलगी सई (३) यांच्यासोबत शरद बन्सी मुंडे यांचे तांदळाच्यावाडी येथील सासरे बबन ज्ञानोबा तांदळे देवदर्शनासाठी जात होते. पाटोदाजवळ त्यांच्या भरधाव जीपने ट्रकला पाठीमागून धडक दिली. यात मुंडे कुटुंबातील सात जणांसह आठ जणांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती सकाळी समजताच गावावर शोककळा पसरली. या अपघातात आई , मुले, दीर भावजय असा एकाच परिवारातील सात जणावर काळाने घाला घातल्याने गावात चूल पेटली नाही. मुंडे कुटुंबातील सातही जणांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत होता.