बीड : खरीप २०१८ हंगामातील शेतकऱ्यांना आगाऊ विमा भरल्याचे कारण दाखवत जिल्ह्यातील ९० हजार शेतकऱ्यांना सोयाबीन विम्याच्या लाभापासून वंचित ठेवले आहे. ही प्रकरणे तात्काळ निकाली काढून कंपनीने सर्व पात्र शेतक-यांना लाभ द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी बीड येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयासमोर सोमवारी शेतक-यांनी आंदोलन केले.ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील ९० हजार शेतक-यांना सोयाबीन विम्याचा लाभ देण्यात आलेला नाही. या संदर्भात गेवराई तालुक्यातील डॉ. उद्धव घोडके यांनी वेळोवेळी कंपनीशी व प्रशासनाशी मागणी करुन देखील मागील पाच महिन्यांपासून कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. तक्रार निवारण करण्यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये शेतकºयांनी २०१८ खरीप विम्याच्या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत. जिल्हाधिका-यांनी देखील या तक्रारी निकाली काढण्याचे आदेश कंपनीच्या प्रतिनिधीला दिले आहेत. परंतु सोयाबीन विम्याची रक्कम अजूनही पात्र शेतकºयांच्या खात्यावर जमा झालेली नाही. ती तत्काळ जमा करावी, या मागणीसाठी डॉ. उद्धव घोडके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आत्माराम भिताडे, राजेंद्र धोतरे, ओंकार रासकर, मनोज खरात, स्वप्नील ठेंगरे यांच्यासह शेतकरी सहभागी होते.
बीड जिल्हा कृषी कार्यालयावर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:25 AM