बेशिस्त पार्किंगला आळा घाला
बीड : शहरातील नगर रोड भागात नागरिक बेशिस्त वाहने उभे करीत आहेत. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक खोळंबत आहे. विशेषत: या भागात शासकीय कार्यालय असल्याने सतत वाहतूक आणि नागरिकांची वर्दळ असते. कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांनी या वाहनधारकांना शिस्त लावण्याची गरज आहे.
अरुंद रस्त्यामुळे कोंडी
बीड : शहरातील भाजी मंडईत असलेले अरुंद रस्ते व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे कोंडी कायम राहत आहे. पालिका अथवा पोलिसांकडून यावर कसलीच कारवाई अथवा उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. रिक्षा, चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने कोंडी होत आहे. नियोजन करून ही कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे.
जादा भाडे घेऊन लुटण्याचे प्रकार
बीड : तालुक्यातील ग्रामीण परिसरात विविध भागांत खासगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण नाही. खासगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून जादा भाडे घेऊन लुटण्याचे प्रकार वाढत आहेत. ग्रामीण भागातून शेतकरी भाजी विकण्यासाठी येतात, मात्र त्यांना जादा पैसे मोजावे लागत आहेत.
कचऱ्यामुळे दुर्गंधी वाढली
माजलगाव : शहरातील नवीन बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे पडून आहेत. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. दुर्गंधीचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागतो. परिणामी डासांचे प्रमाण वाढत आहे. स्वच्छतेची मागणी जोर धरू लागली आहे. आरोग्य धोक्यात आले आहे.
रस्ते दुरूस्तीची मागणी
बीड : बीड बायपासचे काम पूर्णत्वास जाऊन दोन वर्षे उलटली असताना लोकप्रतिनिधींनी शहरवासियांना दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही. बीड शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम होणे अपेक्षित असताना याकडे लोकप्रतिनिधींचा कानाडोळा असल्याचे दिसते. दर्जेदार रस्ते करून वाहनधारक, नागरिकांना सुविधा द्याव्यात, अशी मागणी होत आहे.