परळी : कांदा निर्यात बंदी उठवावी, शेतकरी संघटनेचा विजय असो, अशा घोषणा देत बीड जिल्हाच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या परळी येथील निवासस्थानासमोर शेतकरी संघटनेतर्फे कांद्याची रांगोळी काढून बुधवार दि. २३ रोजी आंदोलन करण्यात आले.
कांदा निर्यात प्रकरणात खासदार यांनी लक्ष घालावे, असे शेतकरी संघटनेचे म्हणणे होते. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्ते मास्क लावून व शारिरिक अंतराचे पालन करुन आंदोलनात सहभागी झाले होते .यावेळी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष अशोक नरवडे, शेतकरी संघटना युवा आघाडी बीड जिल्हा अध्यक्ष कैलास सोळंके, परळी ता अध्यक्ष ऍड. राहुल सोळंके, शिवप्रसाद अप्पा खेञी, अनंत यादव, नरसाळे आदींची यावेळी उपस्थिती होती.
केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंद करुन कांदा उत्पादक शेतकर्यांवर अन्याय केला आहे. खासदार हे लोकसभेतील शेतकर्यांचे लोकप्रतिनिधी आहेत. कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यासाठी खासदारांनी लोकसभेत आवाज उठवावा. त्यांच्या कर्तव्याची त्यांना जाणीव करुन देण्यासाठी शेतकरी संघटनेने हे राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे , असे कैलास सोळंके यांनी सांगितले. खा. प्रितम मुंडे यांचे स्वीय सहायक राजेंद्र लोढा यांनी निवेदन स्वीकारले.