Beed Baban Gitte: परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात फरार असलेल्या बबन गित्तेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण आठ महिन्यांहून अधिक काळ फरार असलेल्या बबन गित्तेभोवती कायद्याचा फास आवळला जाणार असून त्याची संपत्ती जप्त करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी गित्ते याच्या संपत्तीची माहिती मागवली असून त्याची संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला जाणार असल्याचे समजते.
मरळवाडी गावचे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर जून २०२४ मध्ये गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटा)चे उपाध्यक्ष शशिकांत उर्फ बबन गित्ते याच्यासह पाच जणांविरुद्ध खुनाचा व खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा परळी शहर पोलिस ठाण्यात रविवारी सकाळी दाखल करण्यात आला होता. परंतु हा गुन्हा दाखल झाल्यानंतर बबन गित्ते फरार झाला.
पोलिस तक्रारीत काय म्हटलंय?
पाच जणांनी संगनमत करून शहरातील बँक कॉलनी परिसरात सरपंच बापू आंधळे व ग्यानबा गित्ते या दोघांना बोलावून घेतले. यावेळी बापू आंधळे यांना तू पैसे आणलेस का, असे बबन गित्ते म्हणाला. तेव्हा पैशांच्या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली आणि यावेळी बापू आंधळे यांच्यावर बबन गित्ते याने कमरेचा पिस्तूल काढून डोक्यात गोळी मारली व दुसऱ्या एकाने कोयत्याने मारून बापू आंधळे यांना जिवंत ठार मारले. तसेच ग्यानबा गित्ते यास तिसऱ्याने छातीत गोळी मारून जखमी केले, असं आंधळे यांच्या हत्येनंतर देण्यात आलेल्या पोलिस तक्रारीत म्हटलं होतं.