बीड : शहरात हातभट्टी दारू, शिंदी, ताडी तयार करून विक्री करणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात रवानगी केली. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
प्रल्हाद बापुराव भालशंकर (रा.हनुमान नगर, बीड) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात बीड शहरात शिंदी, ताडी दारू तयार करणे, जवळ बाळगणे आणि तिची विक्री करणे अशा स्वरूपाचे ९ गुन्हे दाखल आहेत. पाेलिसांनी वारंवार कारवाया केल्यानंतरही तो जुमानत नव्हता. अखेर पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या आदेशानुसार बीड शहरचे पोलिस निरीक्षक मुकूंद कुलकर्णी यांनी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला.
याला मान्यता मिळताच बुधवारी त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलिस निरीक्षक संतोष साबळे, शहरचे मुकूंद कुलकर्णी, उपनिरीक्षक किरण पवार, सुशेन पवार, अशपाक सय्यद, मनोज परजणे, शेख शहेंशाह, सिरसाट, अभिमन्यू औताडे, बप्पासाहेब घोडके आदींनी केली.