तंटामुक्त गाव समित्या कागदावरच
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांना महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. मात्र, पुरस्कार प्राप्त झालेल्या गावांमध्ये अनेक वादविवाद उद्भवत आहेत. तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध धंदे सुरू असल्याने तंटामुक्त समितीचा बोजवारा उडत आहे. तंटामुक्ती समितीमध्ये निवड होण्यासाठी चढाओढ लागते; परंतु प्रत्यक्ष कामाकडे मात्र, या समितीतील सदस्यांचे दुर्लक्ष होत आहे.
गढूळ पाण्याने नागरिक हैराण
बीड : शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. मात्र, शहरातील विविध वॉर्डांत गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. शहरवासीयांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
साबलखेड-आष्टी रस्त्यावर खड्डे खड्डेच
कडा : आष्टी तालुक्यातील साबलखेड-आष्टी या १५ किलोमीटर रस्त्यावर खड्डेच खड्डेच झाले आहेत. पावसाने हा रस्ता पार उखडून गेला असून, काही ठिकाणी तर चक्क रस्ताच वाहून गेला आहे. साबलखेडनजीक पुलावर मोठा खड्डा पडला आहे. यामुळे पूल खचण्याची भीती आहे. या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी वाहनधारक, नागरिकांमधून केली जात आहे.