शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील शेकडो शेतकरी अद्यापही शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत. दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. दि. २७ डिसेंबर २०१९ रोजी राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती. यामध्ये शेतकऱ्यांना टप्याटप्याने कर्जमाफी मिळणार होती. परंतु कोरोनाच्या उद्भवलेल्या संकटामुळे ही योजना लांबली. याचा मोठा फटका अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. या वंचित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ लवकर मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
धारूर आडस रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
धारूर : धारूर ते आडस या तेरा कि.मी. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून, अपघाताचे प्रमाण यामुळे वाढले आहे. वाहनधारक व प्रवासी वैतागून गेले आहेत. या रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.