गेवराई तालुक्यातील शेकटा येथील यमाजी रामभाऊ हाके यांनी महावितरणकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला होता. त्यांचे पत्र्याचे घर होते. तेथे दोन एलइडी बल्ब व एक पंखा होता. यमाजी हाके हे मजुरीनिमित्त सतत बाहेर असत. जाताना बल्ब व पंखा बंद करून जात. २०१३ ते २०१७ पर्यंत घर बंद करून ते मजुरीसाठी बाहेरगावी गेले होते. या बंद काळात त्यांना ३७ हजार ८०० रूपयांचे विद्युत बील आले. त्यानंतर हाके यांनी २०१९ मध्ये १३६५ युनिटचे बील देण्याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता व सहायक अभियंत्यांकडे अर्जाद्वारे विनंती केली. तरीदेखील हाके यांना ४३ हजार ६०० रूपयांचे बील देण्यात आले. त्यामुळे त्यांनी ग्राहक मंचात धाव घेत कार्यकारी अभियंता व सहायक अभियंत्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली व
१३६५ युनिटचे बील मिळावे, अशी मागणी केली.
दोन्ही बाजुचे पुरावे व युक्तीवाद ऐकून जिल्हा ग्राहक मंच आयोगाने निकाल दिला. या प्रकरणात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने हाके यांची तक्रार मंजूर केली. कार्यकारी अभियंता व सहायक अभियंता यांनी तक्रारदारास १३६५ युनिटचे बील देण्याचे व खंडीत वीज पुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले. तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारीरीक त्रासापोटी ३ हजार रूपये व तक्रारीच्या खर्चापोटी २ हजार रूपये कार्यकारी अभियंता व सहायक अभियंत्यांनी द्यावे, असे आदेशित केले.
या प्रकरणात तक्रारदाराच्या वतीने ॲड. अविनाश गंडले यांनी काम पाहिले. त्यंना ॲड. इम्रान पटेल, ॲड. किरण मस्के, ॲड. बप्पा माने, ॲड. सुरक्षा जावळे यांनी सहकार्य केले.