बीड : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. साहित्याचा अपुरा साठा असल्याने विजपुरवठा विस्कळीत झाला आहे. ग्राहकांमधून ओरड होत असतानाही महावितरण मात्र सुस्त असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने फिल्डवर असणार्या अधिकारी, कर्मचार्यांना ग्राहकांना तोंड देताना नाकीनऊ आल्याचे दिसते.
ग्रामीण भागातील विद्यूत खांब व तारा जीर्ण झालेल्या आहेत. या तारांची आणि खांबाची मागील अनेक वर्षांपासून दुरूस्तीच झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. सहायक व कनिष्ठ अभियंत्यांकडून वरिष्ठांकडे वारंवार साहित्याची मागणी केली जाते, परंतु त्यांच्याकडून याकडे विविध कारणे सांगून बगल दिली जात असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या दुर्लक्षामुळे वीज पुरवठा विस्कळीत होत असून रात्ररात्र अंधारात काढण्याची वेळ आली आहे.
एकीकडे वीज बील वसूलीसाठी महावितरणकडून तगादा लावला जातो. कारवाईची भाषा केली जाते, परंतु याच ग्राहकांना महावितरणकडून सुरळीत सेवा दिली जात नाही. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.अधीक्षक अभियंता अजिनाथ सोनवणे यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.
ढेपाळलेला कारभार सुरळीत करादरम्यान, फिल्डवर काम करणारे, सहाकय अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि लाईनमन यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागत आहे. या अधिकार्यांनी वरिष्ठांकडे जाण्याचा सल्ला दिल्यावर वरिष्ठ त्यांना धारेवर धरतात. तर साहित्य उपलब्ध नाही, असे ग्राहकांना सांगितले, तर त्यांना हे कारणे सांगतात असे वाटते. आणि यातून त्यांच्यात वाद होतो. अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. दिवसेंदिवस महावितरणचा कारभार ढेपाळत चालला आहे. यावर तात्काळ कारवाई करून सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.