माजलगाव : शिवजन्मोत्सवानिमित्त गत ७ वर्षांपासून माजलगावात बाळू ताकट नामक युवकाच्या पुढाकारातून सामाजिक दायित्व म्हणून नि:शुल्क सर्वधर्मीय विवाह सोहळे पार पडत आहेत.या वर्षीही सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून कोरोना महामारीच्या नियमाच्या चौकटीत आणि खा. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत २१ फेब्रुवारी रोजी सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात सनई चौघडा वाजणार आहे.
गेल्या सात वर्षांपासून शिवसेवा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सर्वधर्मीय विवाह सोहळा तालुका परिसरातील गरीब व गरजूंना वरदान ठरत आहे.यावर्षी कोरोना महामारीचे संकट असले तरी नियमांच्या चौकटीत ही परंपरा पुढे नेण्यात येणार आहे. २१ फेब्रुवारी रोजी खा. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गात मुंबईच्या विशेष ढोल पथकाच्या गजरात व अनेक देखाव्यांच्या साक्षीने महाराजांची मिरवणूक निघणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिव जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे २१ रोजीच्या विवाह सोहळ्यात गेल्या ७ वर्षांपासून विवाह सोहळ्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे.तसेच कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय इस्पितळातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. गरजूंनी नाव नोंदणी करून या विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक बाळू ताकट यांच्यासह प्रशांत होके, राहुल मुगदिया,सुरज पवार अमर राजमाने दत्ता होके, युवराज नरवडे, बल्ली होके, प्रसाद सावंत, यांनी केली आहे.