बीड : मुंबईच्या एका व्यापाऱ्याने जालना व बीड येथील सायकल मार्टधारकांकडून उधारी जमा करून आलेले ३ लाख ४५ हजार रूपये बॅगमध्ये ठेवले. बीड बसस्थानकातील स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी गेल्यानंतर बॅग बाजुला ठेवली. याचवेळी नजर ठेवून असलेल्या चोरट्यांनी पैशांची बॅग लंपास केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
महेंद्र भालचंद्र सहा (५६, रा.बोरीवली, मुंबई) असे सायकल व्यापाऱ्याचे नाव आहे. सहा हे सायकलचे व्यापारी आहेत. १६ तारखेलाच ते घराबाहेर पडले. जालना येथील सायकल व्यापाऱ्यांकडून उधारी जमा करून ते मंगळवारी बीडमध्ये आले. बीडमधील पाच ते सहा दुकानदारांकडून २ लाख रूपये जमा केले. त्यानंतर ते बीड बसस्थानकासमोरील एका सायकल दुकानात आले. येथे त्यांनी पैसे मोजले. यावेळी त्यांच्याकडे तीन लाख ४५ हजार रूपयांची रक्कम होती.
ही सर्व रक्कम त्यांनी बॅगमध्ये ठेवून पुढे सोलापूरला जाण्यासाठी बसस्थानकात गेले. परंतु बसला वेळ असल्याने ते स्वच्छतागृहात लघुशंकेला गेले. बॅग काही सेकंदासाठी बाजूला ठेवताच चोरट्यांनी ती लंपास केली. हा प्रकार समजताच त्यांनी सर्वत्र शोध घेतला. परंतु कोठेच न मिळाल्याने त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोउपनि आर.ए.सागडे हे करीत आहेत.
संशयीत सीसीटीव्हीत कैदबसस्थानकासमोरील दुकानात सहा गेल्यानंतर एक व्यक्ती बाहेर संशयीतरित्या उभा आहे. दुकानातून बाहेर पडून स्थानकाकडे निघताच चार व्यक्ती त्यांच्या पाठिमागे जातात. हेच चोरटे असण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी व्यक्त केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोउपनि सागडे यांनी याची सर्व माहिती घेतली आहे. लवकरच हा तपास पूर्ण करू, असा विश्वासही सागडे यांनी व्यक्त केला.