परळी : बीडहून परळीला लवकर येता आले. पण, त्यापेक्षा जास्त वेळ परळीतील ईटके चौक ते कार्यक्रमस्थळी येण्यास लागल्याचे सांगत खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी चिमटा काढल्यानंतर, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही आपल्या शैलीत उत्तर दिले. कोण वेळेवर आले? यापेक्षा दोघांना एकत्रित आणले ही वेळ महत्त्वाची असल्याचे सांगून आयाेजकांचे त्यांनी आभार मानले. परळी शहरातील ईटके कॉर्नर रोडवर रस्त्याचे काम चालू आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. तसेच, शहरातही भू-गटार योजनेचे काम चालू आहे, ही कामे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनात चालू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यात टोलेबाजी झाली.
येथील शहरातील गणेशपार विभागातील गवंडीगल्लीत ब्राह्मण सभेच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा व स्व. मनोहरपंत बडवे सभागृह लोकार्पण सोहळ्याचे सोमवारी आयोजन केले होते. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व खा. डाॅ. प्रीतम मुंडे हे भाऊ-बहीण एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. ब्राह्मण सभेने निर्माण केलेले हे मंदिर व सभागृह परळीच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारे व्यासपीठ म्हणून पुढे येईल, असा विश्वास खा. प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केला. बीड येथून परळीला लवकर येता आले. पण, त्यापेक्षा जास्त वेळ परळीचे ईटके चौक ते कार्यक्रमस्थळी येण्यास लागला, असा चिमटा खा. प्रीतम मुंडे यांनी आपल्या भाषणातून काढला. हाच धागा पकडत त्यांचे बंधू पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी खा. प्रीतम मुंडे यांना प्रत्युतर दिले. कुठलीही वास्तू उभारताना पाया खोदावा लागतो. पाया पक्का करण्यास वेळ लागतो. परळीचा पाया भक्कम करण्यात येत आहे, त्यामुळे ताईंना या ठिकाणी येण्यास वेळ लागल्याचे मुंडे म्हणाले. माझ्यासाठी कोण वेळेवर आले हे महत्त्वाचे नसून दोघांना एकत्रित आणले ती वेळ महत्त्वाची आहे. ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणले त्यांचे आभारही पालकमंत्री मुंडे यांनी मानले. या सोहळ्यात सकाळच्या सत्रात प.पु.यज्ञेश्वर सेलूकरमहाराज यांच्या हस्ते मूर्ती न्यास कार्यक्रम झाला. तर, मुख्य समारोप सोहळा पालकमंत्री धनंजय मुंडे, खा.डाॅ. प्रीतम मुंडे, आ. संजय दौंड आदींच्या उपस्थितीत पार पडला. प्रास्ताविक बाजीराव धर्माधिकारी यांनी केले.
310821\img-20210830-wa0876_14.jpg