बीड : येथील नगरपालिका कर्मचाऱ्यांना काम करूनही वेतन वेळेवर मिळत नसल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला होता. तीन महिन्यांपासून वेतन थकल्याने त्यांची उपासमार होत होती. हीच बाब चव्हाट्यावर आल्यानंतर केवळ नोव्हेंबर महिन्याचे वेतन अदा केले आहे. अद्यापही डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे संताप कायम आहे.
बीड नगरपालिकेत जवळपास ५२५ कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या वेतनासाठी पालिकेला महिन्याकाठी २ कोटी १० लाख रुपये रक्कम लागते; परंतु शासनाकडून पालिकांना सहायक अनुदान मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन होत नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होते. काेरोनासारख्या महामारीत काम करूनही नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे वेतन रखडले होते. हीच बाब निदर्शनास आणताच नोव्हेंबर महिन्याचे वेतन अदा करण्यात आलेले आहे. परंतु अद्यापही डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे वेतन अदा केलेले नाही. त्यामुळे त्यांच्यामधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत काही संघटनांनी शुक्रवारी मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांना निवेदन देऊन वेतन अदा करण्याची मागणी केली आहे.