तीन महिन्यापूर्वी माजलगाव नगरपालिकेने स्वच्छतेचे टेंडर काढले होते. संबंधित ठेकेदाराने हे टेंडर ३६ लाख रुपये कमीने घेतले होते. सुरूवातीला संबंधित ठेकेदाराने शहरातील स्वच्छतेचे काम उत्कृष्ट केले. परंतु त्यानंतर नगर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यास वारंवार त्रास देणे चालु केल्याने त्याने सर्वांचे तोंड बंद केल्यानंतर त्यास काम करू दिले जाऊ लागले. त्यामुळे त्याने सुरुवाती पेक्षा आपली यंत्रणा एकदम निम्म्यावर आणली. टेंडर चालू करून तीन महिने उलटले तरी नगरपालिकेने संबंधित ठेकेदाराला एक रुपयाही न दिल्यामुळे संबंधित ठेकेदाराने नगरपालिकेला दोन दिवसापूर्वी एक पत्र लिहून मला बिल न दिल्यास काम बंद करण्यात येईल असा इशारा दिला होता. परंतु याकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने संबंधित ठेकेदाराने मंगळवारपासून शहरात फिरणाऱ्या घंटागाड्या , रस्ते साफसफाई व नालीची स्वच्छता करणे थांबवले आहे. यामुळे शहरात दोन दिवसापासून जागोजागी घाण दिसत असून घंटागाडी फिरत नसल्यामुळे घरोघरी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
संबंधित गुतेदाराला बिल देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. त्यांनी परवानगी देताच ठेकेदाराचे बील देण्यात येईल.
--- शेख मंजुर , नगराध्यक्ष