बीड : सामाईक ढोलकीच्या वादातून एकाचा खून तसेच एकास जखमी केल्याप्रकरणी आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या-४ आर. एस. पाटील यांच्या न्यायालयाने सुनावली. एकाच प्रकरणात आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा हे अलिकडच्या काळातील बहुधा पहिले प्रकरण असावे.गेवराई तालुक्यातील इरगाव येथील तुकाराम भाऊ माळी व आरोपी यांच्यात सामाईक ढोलकी होती. नवरात्रीचे गाणे म्हणण्यासाठी २ ऑक्टोबर २०१४ रोजी तुकाराम यांनी धर्मराज माळी याच्या घरून ही ढोलकी आणली होती.
या वादातून ३ ऑक्टोबर २०१४ रोजी एकाने बाभळीच्या लाकडाने तुकारामच्या डोक्यात, मानेवर, कमरेवर मारले. त्यामुळे तुकाराम बेशुुध्द पडला. त्यावेळी तुकारामचा मुलगा धावून आला असता त्याला काठीने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. दरम्यान उपचारासाठी नेताना तुकारामचा मृत्यू झाला. याप्रकरणी एएसआय ए. डी. सांगळे यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणात फिर्यादी, जखमी साक्षीदार, प्रत्यदर्शी साक्षीदार, इतर परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुराव्यांचे अवलोकन करून व जिल्हा सरकारी वकील ॲड. अजय दि. राख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व अति. सत्र न्या. आर. एस. पाटील यांनी आठ आरोपींना दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी १० हजार रूपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे सश्रम कारावास तसेच कलम ३२४ प्रमाणे प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावास तसेच कलम १४८ भादंविनुसार ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाच्या वतीने १३ साक्षीदार तपासण्यात आले. महादेव लक्ष्मण पवार, बाळू उत्तम माळी, बाळू लक्ष्मण पवार, भागवत सखाराम माळी, भीमा उत्तम माळी, धर्मराज उत्तम माळी, बबन उत्तम माळी, येणूबाई लक्ष्मण पवार सर्व रा. इरगाव ता. गेवराई. यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली.