बीड : मावसबहिणीच्या कुटुंबातील वाद मिटवताना झालेल्या भांडणाचा राग मनात धरून, गुरुवारी एका तरुणाचे अपहरण झाले होते. पहाटेच्या दरम्यान त्याचा खून करून त्याला आंतरवन पिंप्री फाटा परिसरातील डोंगरात झुडुपात फेकल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. त्यानंतर तपासात खुनी निष्पन्न झाला असून, तो फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्याचे काम पिंपळनेर पोलीस करत आहेत.
राजाभाऊ अशोक खराडे (वय २४ रा. नागापूर खुर्द ता.बीड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या मावसबहिणीच्या कुटुंबात वाद सुरु होता. तो मिटवण्यासाठी राजाभाऊ गेला होता. त्यावेळी झालेल्या वादाच्या कारणावरून मावसबहिणीचा दीर महारुद्र मच्छिद्र परसकर (रा.उमरद खालसा ता.बीड) याचे व मयत राजाभाऊ यांचा वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून आंतरवली फाट्यावर महारुद्र गेला. त्याठिकाणी जाऊन एका व्यक्तीच्या फोनवरूनर राजाभाऊ याला फोन केला व त्याठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्यात त्याठिकाणी देखील वाद झाला. त्यावेळी त्याला चाकूचा धाक दाखवून त्याचे अपहरण केले. हा प्रकार तेथे असलेल्यानी राजेभाऊच्या घरी सांगितला. त्यानंतर राजाभाऊ याच्या आईने तात्काळ पिंपळनेर पोलीस ठाणे गाठून अपहरणाचा गुन्हा गुरुवारी रात्रीच दाखल केला होता.
पोलीस रात्रीपासून त्याचा शोध मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून घेत होते. त्यावेळी आंतरवण पिंप्री फाटा परिसरात शोध घेत असताना शुक्रवारी सकाळी राजाभाऊ याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याचे दिसून आले. त्यानंतर घटनास्थळी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रमुख सोपनि शरद भुतेकर, सपोनि सानप, हावलदार एच.सी.तेलप, पोना सुरवसे, शेख, जाधव, चांदणे, कानडे यांनी पंचनामा केला. प्राथमिक तपास केला असता, महारुद्र याने चाकूचा धाक दाखवून अपरहण केल्याचे उघड झाले. त्या घटनेनतर महारुद्र हा फरार असून त्याचा शोध पिंपळनेर पोलीस घेत आहेत. या घटनेचा तपास सपोनि ज्ञानदेव सानप हे करत आहेत.
चाकू केला जप्तमयत राजाभाऊ खराडे हा नागापूर खुर्द. येथील घरी असताना त्याला आंतरवन पिंप्री फाटा परिसरात दुसऱ्याच्या फोनवरून संपर्क करून बोलावून घेण्यात आले होते. त्यानंतर महारुद्र परसकर याने चाकूचा धाक दाखवत त्याचे अपहरण केले होते. त्याच चाकूने वार करून त्याचा खून केला. तो चाकू पोलिसांनी घटनास्थळावरून हस्तगत केला आहे.
उपअधीक्षकांची घटनास्थळाला भेट खुनाच्या घटनेची माहिती मिळताच बीडचे पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी घटनास्थळी भेट दिली. n पाहणी करून तपासाच्या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.