बीड : शहरातील गजबजलेल्या बीड बसस्थानकासमोर ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी भरणाऱ्या युवकाचा खून केला. हा थरार मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास स्काऊट गाइड भवनसमोर घडला. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोघांना ताब्यात घेतले. जिल्हा रुग्णालय व घटनास्थळावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, खुनाचे कारण अस्पष्ट आहे. शेख शाहेद शेख सत्तार (२२, रा. धांडे गल्ली, बीड) असे मयताचे नाव आहे.
शाहेद हा बीड बसस्थानकासमोर ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी भरायचा. मंगळवारी दुपारी तो प्रवाशांना आवाज देत असताना तिघे जण त्याच्याजवळ आले. संभाषणानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर एकाने धारदार चाकूने शाहेदच्या पोटात वार केला. वार होताच शाहेद जमिनीवर कोसळला. यादरम्यान वर्दळीचा रस्ता असतानाही त्याला कोणी मदत केली नाही. तोपर्यंत मारेकऱ्यांनी तेथून धूम ठोकली. थोड्या वेळाने काही लोकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शाहेदला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच विविध तज्ज्ञांना बोलावून पंचनामाही करण्यात आला.
जिल्हा रुग्णालयाला छावणीचे स्वरूपघटना घडताच नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे परिसरात एकच गर्दी जमली होती. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने या ठिकाणी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. या ठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात केल्याने जिल्हा रुग्णालयाला छावणीचे स्वरूप आले होते.
शाहेदला मारून ठाण्याकडे धावशाहेदला मारल्यानंतर मारेकऱ्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. लोक मारतील, या भीतीने त्यांनी ठाणे गाठल्याची चर्चा आहे. रात्री उशिरापर्यंत या दोघांची शिवाजीनगर ठाण्यात चौकशी सुरू होती.