बीड : सोनपेठ येथील चोरीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असलेल्या एका विणेक-याने आज पहाटे बदनामीच्या भीतीने परळी तालुक्यातील तडोळी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. लिंबाजी बापूराव सातभाई असे आत्महत्या केलेल्या विणेकराचे नाव आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी कि, परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात गंगापिंप्री येथे २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान दत्त जयंतीनिमित्त सप्ताहाचे आयोजन केले होते़ या सप्ताहामध्ये वैजनाथ रंगनाथ रोडे यांनी परळी तालुक्यातील तडोळी येथील लिंबाजी बापूराव सातभाई याला सात दिवसांसाठी १५०० रुपये ठरवून विणेकरी म्हणून बोलावले होते. तसेच सातभाई यांची वैजनाथ रोडे यांच्या घरी राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती़ ४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता रोडे यांच्या घरावरील सज्जामध्ये ठेवलेल्या १५ ते २० ग्रंथांमधून ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचायचा आहे़, असे म्हणून ग्रंथ पाहत असताना ग्रंथाच्या पाठीमागे ठेवलेली पाच तोळे सोन्याची दागिन्याची पिशवी चोरून नेली़, अशी तक्रारी वैजनाथ रोडे यांनी सोनपेठ पोलिसांकडे दिली. त्यावरुन ११ डिसेंबर रोजी सोनपेठ पोलीस ठाण्यात लिंबाजी सातभाई याच्याविरूद्ध गुन्हा नोंद झाला.
सप्ताह संपल्यानंतर ५ डिसेंबरला विणेकरी सातभाई हे त्यांच्या गावी परतले होते. त्यानंतर ११ तारखेला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची त्यांना माहिती मिळाली. यामुळे बदनामी झाल्याने ते अस्वस्थ होते. यातूनच त्यांनी आता मी लोकांना तोंड कसे दाखवू असे म्हणत आज पहाटे तडोळी येथील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.