बीड : आपल्या पित्याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी रामाने १४ वर्षे वनवास भोगला. तसा मीही भोगला होता. परंतु, माझा वनवास संपला असून लवकरच आता राज्याभिषेक होणार आहे, असे म्हणत महायुतीच्या उमेदवार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विजयाबाबत विश्वास व्यक्त केला. तसेच, आपण दिल्लीला जाण्यासाठी उमेदवारी मागितली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील श्रीराम नवमीनिमित्त आयोजित सप्ताहाची गुरुवारी सांगता झाली. यावेळी पंकजा मुंडे यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन फुगडी खेळण्याचा आनंदही लुटला. रामाचे जीवन माझ्यासाठी आदर्श आहे. पिता दशरथ यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी रामाने १४ वर्षांचा वनवास भोगला. असेच वचन आणि शब्द पूर्ण करण्यासाठी राजकारण आणि समाजकारणातही वनवास भोगायची तयारीसुद्धा आपल्याला ठेवावी लागते. तो वनवास भोगून मी आलेली आहे. वनवासानंतर राज्यभिषेक असतो. आता तो होणार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. भविष्यात जो मान माझ्या माध्यमातून मिळेल तो माझा नसून तुम्हा सर्वांचा असेल, असेही त्या म्हणाल्या.