सोमनाथ खताळ
बीड : परळी माझे सासर आहे आणि मी आता परळीतच रहायला येत आहे. मी मुला बाळांसह येणार आहे. मी आल्यावर मला जिवंत जाळले तरी चालेल, पण मी येणारच आहे, असा व्हिडिओ करुणा शर्मा यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. रविवारी दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे विराेधातील सर्व पुरावे माध्यमांना देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
राज्याचे सामाजिक व न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे अडचणीत येऊ पाहत आहेत. काही महिन्यांपूर्वीच आपण धनंजय मुंडेची पत्नी सांगणाऱ्या करुणा शर्मा यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करून आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. बहिणीवर अत्याचार केल्याचा आरोपही त्यांनी मुंडेंवर केला होता. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते. परंतु नंतर हे प्रकरण निवळले. आता करुणा मुंडे या आपण परळीला रविवारी परळीला येणार असल्याचे सोशल मीडियावरून इशारा देत आहेत. पत्रकार परिषद घेऊन माझ्या आईचा मृत्यू कसा झाला? बहिणीसोबत काय झाले? याचा पुराव्यानिशी खुलासा करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. धनंजय मुंडेचे कॉल रेकॉर्ड, व्हॉट्सॲप चॅटिंग सर्व माझ्याकडे आहे. जे सीबीआयला पण जुळवता आलेले नाही. हे सर्व सांगितल्याने मला जिवे मारण्याचा धमक्या येत आहेत. परंतु आपण शांत बसणार नाही. मला जिवंत जाळले तरी चालेल, पण मी परळीला सासरी येणारच, असा ठाम विश्वास करुणा यांनी व्यक्त केला आहे. त्या येणार की रोखले जाणार, आल्या तर काय बोलणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
पंकजाताई माझी नणंद
पंकजाताई विरोधातही षडयंत्र रचण्यात आलेले आहे. ते पण सांगणार आहे. तसेच येणाऱ्या २०२४च्या निवडणुकीत मी पंकजाताईला सहकार्य करणार आहे. पंकजाताई या माझी नणंद असून, परिवाराच्या सदस्य आहेत, असेही करुणा यांनी व्हिडिओत म्हटले आहे.
—
काय म्हणतात, करुणा शर्मा...
याबाबत ‘लोकमत’ने शनिवारी दुपारी करुणा शर्मा यांच्याशी फोनवरून संपर्क केला. यावर त्यांनी आपण रविवारी दुपारी परळीला येणारच असल्याचे सांगितले. मला धमक्या दिल्या जात असल्याने माझ्यासोबत पूर्ण सुरक्षेची व्यवस्था केली आहे. परळी हे माझे सासर असून, तेथे माझा हक्क आहे. तेथेच राहण्याची मी मागणी करणार आहे. तसेच सर्व पुरावे मी माध्यमांसमोर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
040921\04_2_bed_10_04092021_14.jpeg
करूणा शर्मा