बीड : कोरोना संसर्ग सर्वत्र वाढलेला असताना यंदाही सासूरवाशिणीला माहेरी आईकडे जाता आले नाही. सुखदु:खाच्या गुजगोष्टी मोबाईलद्वारे करीत ख्यालीखुशालीची विचारणा करीत आहेत. त्यामुळे माहेरी जाण्याची लेकीची ओढ कायम असून आई लेकीच्या भेटीसाठी आतुरलेली आहे.मागील वर्षापासून कोरोेना विषाणूचा संसर्ग सर्वांनाच सतावत आहे. सामाजिक आरोग्य , आर्थिक व्यवस्थेसोबतच नातेसंबंधावर परिणाम दिसून आले आहेत. लेक माहेरी आली की घरात नवी ऊर्जा संचारते. सासरी कराव्या लागणाऱ्या कामातून उसंत म्हणून लेकीला विसावा मिळतो. माहेरी काम करावे लागत नाही, परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मनात मोहर जपणाऱ्या लेकींना भाऊ- बहीण, आई- वडील, भाचे कंपनीच्या भेटीला जाता आलेले नाही. सण, उत्सव, लग्न, साखरपुडा अशा कोणत्याच कार्यक्रमांना जाता येत नसल्याने माय- लेकीची भेट लांबली आहे. मोबाईलच तेवढा संपर्काचा आधार बनला आहे. माहेरी आणि सासरी सगळे सुरक्षित असल्याची त्या खात्री करीत मानसिक समाधान व्यक्त करीत आहेत. तर मामाच्या गावाला जाता येत नसल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड झाला आहे.
लेकीची लागलेली ओढ कोरोनाने सर्वांनाच हैराण करून सोडले आहे.कोरोनाच्या वातावरणामुळे लेकीला वर्ष झाले पाहिले नाही. नातूही आता मोठा झाला आहे. मोबाईलवर त्याचे बोबडे बोल ऐकले की कसे तरी होते, परंतु पर्याय नाही. उन्हाळ्यात रसाळीसाठी लेक,जावई येतील अशी आशा होती; मात्र तेही आता शक्य नाही.- आशा पुरंदरे, अंबाजोगाई.
----------
कोरोनाच्या परिस्थितीमुळे मुलीची सहा महिन्यांपासून भेट नाही. सासरी सुखात नांदत आहे. पुण्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. एकुलती एक मुलगी आणि आई- वडिलांची दुहेरी माया देण्याची जबाबदारी पेलताना खूप काळजी वाटते. तिने यायचं ठरवलं आणि मी जायचं ठरवलं तरी सध्या ते शक्य नाही. - विद्या सुभाष सानप, वीरपत्नी.
----------
सहा महिने झाले, लेकीची भेट नाही. ओढ लागली आहे, करमत नही. नातवाला खेळवायची इच्छा आहे. एप्रिलमध्ये येणार होती पण आधीच लॉकडाऊन पडले. बस चालू झाल्या का नेहमी मुलाला विचारते. नियम बाजूला ठेवून गाडी घेऊन जा आणि लेकीला आण सांगते, परंतु व्हिडिओ कॉल करूनच समाधान मानावे लागते. - सुनंदा सुरेश देशमुख.
--------------
माझं माहेर माहेर
कोरोनामुळे सुखाच्या सर्वच क्षणांवर पाणी फिरले आहे.दररोज माहेरच्या लोकांची आठवण होते.व्हिडिओ कॉल करून त्यांना बोलते. पण माहेरी जाऊन राहण्यात एक वेगळाच आनंद असतो. तिथे राहण्याने नवी ऊर्जा मिळते. हा कोरोना कधी संपेल व माहेरी कधी जाईल, अशी अवस्था झाली आहे. - अंकिता अमित कुलकर्णी.
---------------
एक वर्ष झाले माहेरी राहता आले नाही. मध्यंतरी वडील आजारी असताना भेटायला गेले पण दोन तासच थांबले. कुटुंब सर्वेक्षणाची ड्यूटी सुरू होती. सुटीत माहेरी निवांत राहता येतं पण सध्या ते शक्य नाही. मागच्या आठवड्यात दु:खद घटना घडली, परंतु माहेरचं दु:ख वाटून घेता आलं नाही. फोनवरच संवेदना व्यक्त करता आल्या. --- जया खेडकर, चाटे, बीड.
-----------
मामाच्या गावाला कधी जायला मिळणार?
सध्या शाळा बंदच आहेत. क्लासेसही ऑनलाईन आहेत. परंतु त्या नंतरही मामाच्या गावाला जाता येत नाही.दरवर्षी मामाच्या गावाला गेल्यावर मज्जा येते.पण आता घरातच अडकून पडावे लागले.त्यामुळे कंटाळा येतो. - वेदिका मुडेगावकर, अंबाजोगाई.
-------
चेंज म्हणून मामाच्या गावी लातूरला जायचे आहे. आजी, आजोबा, मामा, मामी सगळेच भेटतात. मजा करायला मिळते. परंतु लॉकडाऊनमुळे जाता येत नाही.
आजी,मामा,मामी फोनवर बोलतात. - भूमी सचिन टवाणी,
--------
दरवर्षी सुटीत मामाकडे गेलं की मामी, आजी, मावशी, आत्या सगळ्यांची भेट होते,परंतु कोराेनाच्या वातावरणामुळे जाता आले नाही. पप्पा जाऊ देत नाहीत. मावशीच्या लग्नालाही आम्हाला जाता आलं नाही. सध्या घरकामात आईला मदत करत असतो. - यशश्री, श्रीया राहुल चाटे, बीड.
-------
माहेरची सावली सासरीच
माहेरच्या सावलीत आई, ताई, वहिनींच्या हातचे गोड- धोड, खमंग नव्या रेसिपींची रेलचेल असते. भातावर लोणकढी तूप, रसाळीचे आंबे लेकीसाठी खास मेजवानी असते. मैत्रिणी भेटतात. बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो. आईसोबत सुख दु:खाच्या गुजगोष्टी होतात. आठवडाभराची पाहुणी सासरी जाताना सुकुनाचा हिरवा चुडा माहेरची आठवण म्हणून मनात साठवण ठेवत पुन्हा सासरी संसाराला लागते,परंतु अनेक पदरी असलेल्या या नातेसंबंधाच्या भेटीला कोरोनाने अडसर आणला आहे. तर दुसरीकडे सासरवाडीतील प्रेम, माया, सासू, सुनेचे नाते, सासऱ्यांची सेवा करण्यात लेकी दंग आहेत.
------