२८ डिसेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या 'सुंदर माझे कार्यालय' अभियानाची रूपरेषा ठरविण्यात आली. नवीन वर्षाच्या दिवशी या अभियानाची सुरुवात झाली. या अभियानांतर्गत तीन भाग असून, त्यामध्ये कार्यालयीन स्वच्छता, प्रशासकीय बाबी व कर्मचारी लाभ यांचा समावेश आहे. कार्यालयीन स्वच्छतेमध्ये कार्यालयाची अंतर्बाह्य स्वच्छता, रेनवॉटर हार्वेस्टिंग, सोलारचा वापर, वृक्षारोपण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कार्यालयाची रंगरंगोटी इत्यादी महत्त्वाच्या बाबी आहेत. प्रशासकीयमध्ये झीरो पेन्डन्सी, अभिलेख वर्गीकरण, जुन्या साहित्यांचे निर्लेखन, जि.प.च्या मालमत्ता मालकी हक्कात नोंद करणे, पेपर लेस कार्यालय, डीबीटीप्रणालीचा १०० टक्के वापर, आदींचा समावेश आहे. कर्मचारी लाभविषयक बाबींमध्ये कर्मचाऱ्यांना स्थायित्वाचा लाभ देणे, पदोन्नती देणे, विविध सेवांविषयक लाभांच्या प्रकरणाचा निपटारा करणे, आदी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. सुंदर माझे कार्यालय अभियानाची सुरुवात पंचायत समिती कार्यालयामध्ये झाडांच्या कुंड्या ठेवून करण्यात आली आहे. ६० झाडांची लागवड केली आहे. प्रत्येक कर्मचारी यांचे स्वच्छ टेबल, नाव ,पद ,तसेच सूचना फलक लावण्यात आले आहेत.
याबाबत गटविकास अधिकारी मीनाक्षी कांबळे म्हणाल्या की कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवून आर्थिक सहभाग घेतला व कार्यालयात रंगरंगोटी केली. अभिलेखे स्वच्छता, नीटनेटकेपणा, स्वच्छ पिण्याचे पाणी याबरोबर पंचायत समितीच्या आवारात कुंड्यामध्ये झाडे लावून शोभा वाढवली आहे.